Aurangabad Gram Panchayat Election Result: राज्यातील सात हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचे (Gram Panchayat Election) मंगळवारी निकाल समोर आले आहेत. मात्र सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटाकडून आपणच राज्यात नंबर वन असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे सर्वच पक्षांनी विजयाचे वेगवेगळे आकडेही जाहीर केले आहे. त्यामुळे खरं कुणाचं अन् खोटं कुणाच याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. दरम्यान याचवेळी काही ठिकाणी एकाच उमेदवारावर दोन पक्षांनी दावा केला आहे. 


कुठे आतिषबाजी तर कुठ ढोल ताशाच्या तालीवर धरलेला ठेका, तर कुठ गुलालाची उधळण असा जल्लोष ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर पाहायला मिळत आहे.  मात्र जेवढी चर्चा या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची आहे, त्यापेक्षा अधिक चर्चा राजकीय पक्षांनी दावा केलेल्या आकड्यांची आहे. कारण प्रत्येक पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत आपणच नंबर वन कसे ठरलो हे पटवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर तसे दावेही केले जात आहे.


कोणाचा काय दावा...



  • भाजपने 2 हजार 482 जागा जिंकल्याचा दावा केला आहे.

  • शिंदे गटाने 842  जागा जिंकल्याचा दावा केला आहे.

  • ठाकरे गट 637 जागा जिंकल्याचा दावा केला आहे.

  • राष्ट्रवादीने 1300 जागा जिंकल्याचा दावा केला आहे.

  • काँग्रेसने 900 जागा जिंकल्याचा दावा केला आहे. 


राज्यातील पाचही महत्वाच्या पक्षाने वेगवेगळे दावे केले आहेत. शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी या दोघांनी आपणच एक नंबर ठरल्याचा दावा केला आहे. आता या सर्व पक्षांच्या दाव्याची आकडेवारी एकत्रित केली तर प्रत्यक्षात असलेल्या जागेपेक्षा कितपट अधिक होतेय. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणूकीत पक्षाचे चिन्ह नसल्याने राजकीय पक्षांच्या या दाव्यात कितपत सत्यता आहे हा तपासाचा भाग आहे. 


मतमोजणी केंद्राच्या बाहेर 'सत्कार स्टॉल'


विशेष म्हणजे राजकीय नेते फक्त दावे करूनच थांबले नाहीत, तर औरंगाबादच्या वैजापूरमध्ये चक्क विजय होऊन येणाऱ्या उमेदवाराच्या सत्कारासाठी मतमोजणी केंद्राच्या बाहेर स्टॉल लावण्यात आली होती. दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी आपल्या कार्यालयात विजयी उमेदवाराच्या सत्कारासाठी कार्यक्रम ठेवला होता. वास्तविक पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्याही पक्षाची अधिकृत उमेदवारी नसते ना पक्षाचा चिन्ह असतो. त्यामुळे या सर्व दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे फक्त दावे करणारेचं सांगू शकतात. 


Aurangabad: निवडून आलेला उमेदवार आपल्या बाजूने आणण्यासाठी लागले चक्क 'सत्काराचे स्टॉल'