Aurangabad Gram Panchayat Election Result 2022: राज्यातील सात हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतसाठी झालेल्या निवडणुकीचे आज निकाल हाती आले आहे. प्रत्यके जिल्ह्यात सर्वच पक्ष निवडून आलेल्या उमेदवारांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात मात्र वेगळचं चित्र पाहायला मिळाले. कारण निवडून आलेला उमेदवार आपल्या बाजूने आणण्यासाठी वैजापूरमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर चक्क 'सत्काराचे स्टॉल' लागल्याचे दिसून आले. तर वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी देखील निवडून आलेल्या उमेदवारांचा आपल्या कार्यालयात सत्कार केला.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष निवडून आलेला सरपंच किंवा सदस्य आपल्याच विचाराचा किंवा आपल्याच पक्षाचा असल्याचा दावा करतात. पण औरंगाबादमध्ये हा दावा करण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. वैजापूरमधील मतमोजणी केंद्राच्या बाहेर ठाकरे गटाच्या नेत्यांनी चक्क एक मंडप टाकून निवडून आलेल्या सरपंचाचा सत्कार केला. तसेच सत्कार केल्यावर तो उमेदवार आपल्याच विचाराचा असल्याचा दावाही केला. त्यामुळे ठाकरे गटाच्या या 'सत्कार स्टॉल'ची परिसरात मोठी चर्चा पाहायला मिळाली.
आमदार बोरनारे यांच्याकडूनही सत्कार...
एकीकडे ठाकरे गटाने मतमोजणी केंद्राच्या बाहेर मंडप टाकून स्टॉल लावला तर, दुसरीकडे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी देखील आपल्या कार्यालयात निवडून आलेल्या सरपंचाचा सत्कार केला. तसेच सत्कार केलेला उमेदवार आपल्या विचाराचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच असल्याचा दावाही केला. त्यामुळे वैजापूर मतदारसंघात 30 ग्रामपंचायतसाठी निवडणुका झाल्या असतांना दोन्ही नेत्यांच्या दाव्यांचं गणित 50 पेक्षा अधिक होत आहे. त्यामुळे अजूनही निवडून आलेला उमेदवार कोणत्या गटाचा यावर स्पष्ट शिक्कामोर्तब होऊ शकलं नाही. मात्र वैजापूर तालुक्यात ठाकरे गट आणि शिंदे गटात निवडून आलेले उमेदवार आपलेच असल्याचं दाखवण्यासाठी जणू स्पर्धा लागली असल्याची पाहायला मिळाले.
एक उमेदवार दोन सत्कार...
ग्रामपंचायत निवडणुकीत अधिकृत पक्ष किंवा पक्षाचे चिन्ह नसते. निवडून आलेला उमेदवार कोणत्याही पक्षात जाऊ शकतो किंवा दावा करू शकतो. त्यामुळे आज झालेल्या मतमोजणीनंतर प्रत्येक पक्षाकडून निवडून आलेला उमेदवार आपल्याच विचाराचा असल्याचा दाखवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे दिसून आले. तर निवडून आलेला एकच उमेदवाराचे दोन ठिकाणी सत्कार स्वीकारताना देखील काही ठिकाणी पाहायला मिळाले. त्यामुळे त्यालाही प्रश्न पडला होता की? आपण कोणत्या पक्षाचे आहोत.
शिंदे गटाला औरंगाबादमध्ये दुसरा मोठा धक्का, बिडकीननंतर महालगावातही पराभव