Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान कन्नड तालुक्यातील डगाव (जेहूर) येथील नदी-नाले, ओढ्याला अचानक पूर आला. यात एक बैलगाडी पलटून दोन मुली व एका महिला वाहून गेली आहे. साक्षी अनिल साक्षी (16), पूजा दिनकर सोनवणे (12), मीना दिलीप मीना (50) अशी वाहून गेलेल्या महिलेच आणि मुलींचे नावं आहेत. तर बैलगाडीचालक विकास हेदेखील पाण्यात पडले होते, पण त्यांन वाचवण्यात यश आले आहे. 


दोघींचे मृतदेह सापडले.एकीचा शोध सुरु 


मीना आणि साक्षी या दोघींचे मृतदेह घटनास्थळापासून एक किलोमीटरच्या अंतरावर सापडले आहे. तर पूजा सोनवणे हिचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. तर याचवेळी बैलगाडीचालक विकास हेदेखील पाण्यात पडले होते. मात्र तिथे उपस्थित काही लोकांनी त्यांना वाचवले. पण पाण्याचा वेग एवढा होता की, साक्षी,पूजा आणि मीना यांना वाचवण्यासाठी काही प्रयत्न करण्याच्या आधीच त्या वाहून गेल्यात. 


कपाशीच्या लागवडीसाठी गेले आणि...


कन्नडमधील आडगाव जेहूर येथील सुखलाल बहिरव यांच्या जातेगाव शिवारातील शेतात कपाशीची लागवड करण्यासाठी गावातील महिला,पुरुष आणि काही मुली मिळून एकूण आठ जण गेले होते. दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने दुपारीच सर्वजण बैलगाडीत बसून घरी परत येत होते. यावेळी ओढ्याला पूर आला आणि बैलगाडी उलटली. वेगात वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात बैलगाडी उलटल्याने झालेल्या दुर्घटनेत पाच जण कसेबसे वाचले. मात्र महिलेसह दोन मुली वाहून गेल्या. 


एकाचा वीज पडून मृत्यू 


कन्नडप्रमाणे सोयगाव तालुक्यात सुद्धा शुक्रवारी विजेच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली. यावेळी तालुक्यातील हनुमंतखेडा येथील एकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. हनुमंतखेड्यातील गट क्रमांक 16 मध्ये किशोर परसराम पवार (20) हा शेतात काम करत होता. वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान पळसखेडा येथे दोघे गंभीर झाले. पळसखेडा परिसरात गट क्र. 50  मध्ये शेतात काम करणाऱ्या शाहरुख सैवर तडवी (19) व दशरथ सोना राठोड (58) हे दोघे वीज पडल्याने गंभीर जखमी झाले.