औरंगाबाद : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या पैठणचे आमदार तसेच रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (Sandipanrao Bhumre) यांना आमदार कोट्यातून म्हाडाची लॉटरी लागली आहे. औरंगाबादमधील म्हाडाच्या चिकलाठाणा येथील घरासाठी शुक्रवारी ऑनलाईन सोडत झाली. या सोडतीत मंत्री भुमरे यांना आमदार कोट्यातून म्हाडाचे घर लागले आहे.  


एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरूंग लावला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह जवळापस 50 आमदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या 50 आमदारांमध्ये  संदीपान भुमरे  यांचा देखील समावेश आहे. याच संदीपान भुमरे यांना म्हाडाची लॉटरी लागल्याची माहिती समोर आली आहे.  


एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. ते सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. संदीपान भुमरे देखील शिंदे यांच्यासोबत गुवाहटीमध्ये आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले तर सातव्या माळ्यावरुन उडी मारु असं संदीपान भुमरे यांनी म्हटले होते. परंतु, एकनाथ शिंदे यांच्यासोबत भुमरे यांनी देखील बंडखोरी केली आहे. याच संदीपान भुमरे याना आमदार कोट्यातून सरकारकडून घर घेण्याचा मोह आवरता आलेला नाही. आज जाहीर झालेल्या लॉटरीत लाभार्थ्यांच्या यादीत संदीपान भुमरे यांचे याव आहे. 


म्हाडाची मराठवाड्यातील बाराशे सदनिकांसाठी शुक्रवारी  ऑनलाईन पध्दतीने सोडत घेण्यात आली. या सोडतीसाठी आठही जिल्ह्यातून जवळपास 11 हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. म्हाडातर्फे विविध गटासाठी काही सदनिका राखीव ठेवण्यात येतात. यातूनच राज्यातील मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभा, विधानसभा, विधानपरिषदेचे विद्यामान आणइ माजी सदस्यांसाठी  देखील दोन टक्के सदनिका राखीव ठेवण्यात येतात. या राखीव कोट्यातून भुमरे यांना घर मिळाले आहे. 


अल्प उत्पन्न गटातून अर्ज 


आमदार कोट्यातून घर मिळण्यासाठी अल्प उत्पन्न गटातून (एलआयजी) औरंगाबातमधील चिकलठाणा येथील म्हाडाच्या प्रकल्पातील सदनिकासाठी संदीपान भुमरे यांनी अर्ज केला होता. त्यानुसार भुमरे यांना एल-2,2,202 क्रमांकाचा प्लॉट लागला आहे.