Aurangabad News: एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत 35 पेक्षा अधिक शिवसेना आमदारांना सोबत नेले आहे. ज्यात काही मंत्र्यांचा सुद्धा समावेश असून, पैठण तालुक्याचे आमदार तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र भुमरे यांच्या याच बंडामुळे आता शिवसैनिक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. भुमरे यांच्या गारखेडा परिसरात असलेल्या कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या होर्डींगला संतप्त तरुणांनी काळे फासले आहे.
स्लीप बॉय ते पाचवेळा आमदार असलेल्या भुमरे यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती. भुमरे शिवसेनेत बंड करतील असे कुणालाही वाटले नव्हते. एवढच नाही तर त्यांच्या या निर्णयावर अजूनही त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास बसत नाही. पण बंडाच्या यादीत भुमरे आघाडीवर आहेत हे सुद्धा तेवढच सत्य आहे. त्यामुळे त्यांच्या याच बंडामुळे औरंगाबादमधील शिवसैनिक आक्रमक होतांना दिसत आहे. शुक्रवारी रात्री काही संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या फलकावर आणि भुमरे यांच्या फोटोला काळे फासले.
पोलीस बंदोबस्त वाढवला...
औरंगाबाद जिल्ह्यातील संदीपान भुमरे (sandipan bhumre), अब्दुल सत्तार (abdul sattar), संजय शिरसाट (sanjay shirsat), प्रदीप जैस्वाल (pradeep jaiswal) आणि रमेश बोरनारे (ramesh bornare) या पाच आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात शामिल होऊन बंड केले आहे. त्यांच्या याच बंडामुळे शिवसैनिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी या पाचही आमदारांच्या घरावर आणि कार्यालयावर पोलीस बंदोबस्त लावला आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून सर्वच पोलीस ठाण्यांना लक्ष ठेवण्याचे आदेश सुद्धा वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वैजापुरात लागले होर्डिंग
वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी सुद्धा बंड पुकारले आहे. मात्र याच बंडामुळे त्यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. तर मतदारसंघात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्याचे होर्डिंग सुद्धा लावण्यात आले आहे. साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत असा उल्लेख या होर्डिंगवर करण्यात आला आहे.