Shiv Sena Meet In Vaijapur: शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदार यांच्यातील वाद काही मिटता-मिटत नसून प्रकरण आता थेट न्यायालयात जाऊन पोहचले आहे. एकीकडे कायदेशीर लढाई सुरु असताना दुसरीकडे शिवसेनेने रस्त्यावरील लढाई सुद्धा सुरु केली. दरम्यान वैजापूर मतदारसंघाचे शिवसेना आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले रमेश बोरणारे यांच्या वैजापूर मतदारसंघात आज शिवसेनेने मेळावा आयोजित केला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे औरंगाबाद संपर्कप्रमुख विजय घोसाळकर यांची उपस्थिती असणार आहे.


गंगापूर चौफुलीवरील साई लॉन्स येथे  या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे. तर याचवेळी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्यासह तालुक्यातील महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती असणार आहे. बोरणारे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर आयोजित करण्यात आलेला हा मेळावा महत्वाचा समजला जातोय. त्यामुळे या मेळाव्यात खैरे आणि शिवसेनेचे नेते काय भूमिका मांडणार याकडे तालुक्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. 


बोरणारे म्हणतात आम्हाला परत यायचं....


दोन दिवसांपूर्वी रमेश बोरणारे यांनी चंद्रकांत खैरे यांना फोन करून उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून, आमची मध्यस्थी करा अशी विनंती केली होती. तसेच माझ्यासोबत अनेकजण आहेत त्यांना सुद्धा परत यायचं असून, आपण मध्यस्थी करावी असे बोरणारे म्हणाले. तर तुम्ही परत या मी उद्धव ठाकरेंशी तुमचे बोलणे करून देतो असं खैरे म्हणाले. 


दानवेंची तक्रार...


बोरणारे यांनी खैरे यांना फोन केल्यानंतर यावेळी अंबादास दानवेंबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच लोकसभा निवडणुकीत तुम्हाला पाडण्यासाठी दानवे यांनी प्रयत्न केल्याच म्हटले. विशेष म्हणजे हे सर्व एबीपी माझावर लाईव्ह सुरु होते. त्यामुळे बोरणारे यांच्या मनातील दानवेंबद्दलची भूमिका आता सर्वांसमोर आल्याची चर्चा दानवे समर्थकांमध्ये आहे. तसेच बोरणारे हे दानवे आणि खैरे यांच्यात वाद लावण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रीया सुद्धा दानवे यांच्या समर्थकांनी दिली आहे.