Aurangabad News: पत्नीच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पतीला याचा विरह सहन न झाल्याने पत्नीपाठोपाठ पतीनेही प्राण सोडून जगाचा निरोप घेतल्याची घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील ब्राम्हणगांव येथे समोर आली आहे. जिजाबाई बिसनराव ढाकणे ( वय 74 ) असे पत्नीचे तर बिसनराव दगडु ढाकणे ( वय 78 ) असे पतीचे नाव आहे. 


पती पत्नीचे अतुट नाते म्हणजे संसाराची दोन चाके, आयुष्यभर एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या पती पत्नीच्या प्रेमाची तुलना करता येत नाही. मग 'साथ जियेंगे-साथ मरेंगे' याप्रमाणे दोघेही आयुष्यभर एकमेकांची साथ दिल्याचे अनेक उदाहरणं आहेत. अशीच काही घटना ब्राम्हणगांवमध्ये समोर आली.  जिजाबाई यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे मृत्यू झाला. दरम्यान जिजाबाई ढाकणे यांच्या पार्थिवावर अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच पत्नीच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने त्यांचे पती बिसनराव ढाकणे यांनी ही आपला प्राण सोडला. त्यामुळे ढाकणे कुटुंबातील सदस्यांवर दु;खाचे डोंगर कोसळले.  


एकाचवेळी निघाली अंत्ययात्रा...


पत्नीनंतर पतीनेही प्राण सोडल्याने ढाकणे कुटुंबात शोककळा होती. घरात सर्वत्र रडारड सुरु होते. अशावेळी एकाचवेळी दोघांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांनतर या दोन्ही वृद्ध पती- पत्नीच्या पार्थिवावर ब्राम्हणगावातील स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पती-पत्नीच्या प्रेताला सोबतच एकाच दिवशी अग्निडाग देण्यात आल्याने उपस्थित ग्रामस्थ व नातेवाईकांच्या डोळ्यातून अश्रूंचा मोठा बांध फुटला होता.


आयुष्यभराची साथ...


बिसनराव आणि जिजाबाई यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली. मात्र काबाडकष्ट करत त्यांनी आपल्या संसाराचा गाडा ओढत नेला. या काळात त्यांनी कधीच एकमेकांची साथ सोडली नाही. प्रत्येक सुखः दु;खात एकजुटीने संघर्ष केला. विशेष म्हणजे आयुष्याच्या शेवटी सुद्धा त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. जगाचा निरोप घेतांना सुद्धा सोबतच निरोप घेतला. एकाचवेळी दोघांच्या निधनानंतर गावात  शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले. एकाचवेळी कुटंबातील दोन्ही छत्र हरवल्याने ढाकणे कुटुंबावर दु;खाचे डोंगर कोसळले आहे.