Municipal Corporation Election: आगामी महानगरपालिका निवडणुका (Municipal Corporation Election) लक्षात घेता राज्यातील सर्वच पक्ष (Political Party) कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि औरंगाबादसह (Aurangabad) महत्वाच्या शहरातील महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी आत्तापासूनचं नेतेमंडळी कामाला लागले आहेत. मात्र असे असतानाच आता देशविरोधी करावयाचा ठपका असल्याने बंदी घालण्यात आलेल्या पीएफआयचं (PFI) राजकीय अंग असल्याचा आरोप असेलल्या एसडीपीआय म्हणजेच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) संघटना महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे. औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदतून एसडीपीआयकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency-NIA), स्थानिक पोलीस आणि ईडीच्या (ED) पथकाने पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांवर संयुक्त कारवाई केली होती. त्यानंतर पीएफआय या संघटनेवर बंदी घालण्यात आली. याचवेळी पीएफआयसोबत एसडीपीआय या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली होती. तर पीएफआयचा एक राजकीय पक्ष म्हणून एसडीपीआयची संघटना असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. त्यामुळे त्यांच्या महानगरपालिका निवडणूकीत उतरण्याच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत बोलतांना एसडीपीआयचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अजहर तांबोळी म्हणाले की, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची आम्ही तयारी सुरु केली आहे. यासाठी आम्ही प्रत्येक वार्डात आमच्या शाखा स्थापन करणार आहे. तसेच पक्षाची सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तसेच काही पक्ष आणि संघटना यांच्यासोबत युती करण्याबाबत भेटीगाठी देखील केल्या जाणार आहे. सोबतच शहरातील मुस्लिम बहुल वार्डात कचरा, पाणी, ड्रेनिजलाईन चोकअप, रस्त्यावर खड्डे, आरोग्य व शैक्षणिक समस्या असून त्या सोडवण्यासाठी आमचे प्राधान्य असेल, असेही तांबोळी म्हणाले.
'एमआयएम'ला फटका बसणार?
काही वर्षांपूर्वी औरंगाबादच्या राजकारणात अचानक एंट्री करणाऱ्या एमआयएमने कमी वेळेत आपलं राजकीय वर्चस्व निर्माण केले. शहरातील मुस्लीम बहुल भागात एमआयएमचे नगरसेवक मोठ्याप्रमाणावर निवडून देखील आले. मात्र आता त्याच औरंगाबादच्या महानगरपालिका निवडणुकीत एसडीपीआयची देखील एंट्री होणार आहे. विशेष म्हणजे एमआयएमप्रमाणेच एसडीपीआयचा डोळा देखील मुस्लीम मतांवरच असणार आहे. त्यामुळे याचा फटका एमआयएमला बसणार का? एसडीपीआयला मुस्लीम मतदार किती प्रतिसाद देणार? हे येणारा काळच सांगेल. मात्र एसडीपीआयने महानगरपालिका निवडणुकीत उतरण्याची घोषणा केल्याने शहरातील राजकीय वातावरण मात्र तापण्याची शक्यता आहे.
संबंधित बातमी...
What is PFI SDPI: बंदी घातलेल्या सिमीचा नवा अवतार पीएफआय? जाणून घ्या ही संघटना आहे तरी काय