Aurangabad Crime News: औरंगाबादच्या फुलंब्री शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. पोळा पाडव्यानिमित्त भरलेल्या कुस्ती आखाड्यातच दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. विशेष म्हणजे वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पोलिसांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे. तर या घटनेत दोन्ही गटातील सहा व पोलीस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. मारहाणीत जखमी झालेल्यांना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले.  


मिळालेल्या माहितीनुसार, फुलंब्री येथे पोळा झाला की दुसऱ्या दिवशी पाडव्यानिमित्त कुस्ती आखाडे होतात. दरवर्षी भरणाऱ्या या आखाड्यात पंचक्रोशीतील पहेलवान सहभागी होतात. यावर्षी सुद्धा नेहमीप्रमाणे आखाडा आठवडी बाजार पटांगणात भरवण्यात आला होता. सुरवातीला छोट्या-छोट्या कुस्ती पार पडल्या. त्यानंतर मात्र चार वाजेच्या दरम्यान गर्दी वाढू लागली. त्यातच याच गर्दीतून एक जण पटांगणात येण्याचा प्रयत्न करीत होता. त्यास पोलिसांनी अडविले मात्र हा युवक ऐकत नव्हता. याचवेळी दुसऱ्या गटातील दोघे तिथे आले व बाचाबाचीनंतर हाणामारी झाली.


दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले...


सुरवातीला झालेल्या हाणामारीमुळे हा तरुण तेथून निघून गेला. मात्र थोड्याच वेळात पुन्हा आपले साथीदारांसह तेथे आला. त्यामुळे पुन्हा दोन गटांत बाचाबाची झाली. दोन्ही गटांतील युवकांनी आपापल्या साथीदारांना देखील बोलावून घेतले. त्यामुळे आखाड्यात कुस्तीऐवजी तुंबळ हाणामारी सुरू झाली. दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. अचानक झालेल्या या राड्यात कोण कुणाला मारत होता काहीच कळत नव्हते. 


पोलीस निरीक्षक तुंबळ हाणामारीत घुसले..


दोन गटात हाणामारी सुरु होताच तिथे बंदोबस्तासाठी असलेले पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे या तुंबळ हाणामारीत घुसले. जीव धोक्यात घालून त्यांनी यातील गंभीर जखमी असलेल्या युवकास कवटाळले. त्यातच इतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा तात्काळ गर्दी पांगवली. त्यामुळे जखमी झालेल्या तरुणाला वेळीच उपचारासाठी पाठवणं शक्य झाले. 


पोलीस अधीक्षकांची तात्काळ धाव 


या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवनिया, अपर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदेत्त भवर यांनी तात्काळ फुलंब्रीत धाव घेतली. तसेच शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता समितीची बैठक घेतली. याबाबत कुठलीही चुकीची माहिती, अफवा पसरवू नये. सोशल मीडियावर चुकीचे मेसेज देऊ नका नसता कठोर कारवाई करण्यात येईल असे कलवनिया यांनी सांगितले. 


मारहाणीत हे झालेत जखमी 


कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील लोकं जखमी झाले असून, पोलीस सुद्धा जखमी झाले आहेत. ज्यात गणेश गंगाधर रघु (36) कृष्णा रत्नाकर पाथ्रे (24), सईद मेहमूद पटेल (24), सोकिया निसार पटेल. (21), बावर इलियास पटेल ( 28) शाकेर इलियास पटेल (32) हे गटबाजीतील युवक तर पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे (53), पोलिस संजय चव्हाण (वय 35) व अनिल शिंदे (वय 33) हे जखमी झाले आहेत.