Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam) पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात अधिकच वाढले आहे. त्यातच आता पुन्हा जुन्या शहराची तहान भागविणारी 700 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फारोळा येथे फुटली. त्यामुळे पुन्हा एकदा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाला तब्बल 14 ते 15 तास लागणार असल्याने शहरातील पाण्याचे टप्पे आठ ते दहा तास उशिराने केले जाणार आहे. त्यामुळे औरंगाबादकरांचा पाणी प्रश्न (Aurangabad Water Issue) काही सुटता सुटत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 


आठ दिवसांपूर्वी 1200 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली होती, त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यातच आता जुन्या शहराची तहान भागविणारी 700 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फारोळा येथे फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, पाण्याचे टप्पे आठ ते दहा तास उशिराने केले जातील, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.


साहित्य मिळण्यास अडचणी 


रविवारी दिवसभर पाणीपुरवठा सुरू असताना फारोळा येथे सायंकाळी जलवाहिनीला गळती लागून ती फुटली. ही बाब लक्षात येताच उपअभियंता एम. एम. बाविस्कर यांनी व त्यांचे सहकारी कनिष्ठ अभियंता आशिष अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला व दुरुस्तीला सुरुवात केली. पण, या जलवाहिनीचे साहित्य मिळण्यास अडचणी येत आहेत. तर दुरुस्तीसाठी 14 ते 15  तासांचा कालावधी लागणार असल्याचे बाविस्कर यांनी सांगितले. यामुळे शहरातील काही भाग, जुने शहर, शहागंज, जिप्सी, विश्वभारती कॉलनी येथून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. त्यामुळे आठ ते दहा तास उशिराने पाणी मिळेल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.


जलवाहिन्या जुन्या झाल्या! 


औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून 700 मिलिमीटर आणि 1200 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांनी पाणीपुरवठा केला जातो. यासाठी ढोरकीन, फारोळा येथे जलशुद्धीकरण केंद्र बनवण्यात आले आहे. मात्र या दोन्ही जलवाहिन्या खूप जुन्या झाल्या असल्याने सतत फुटत असतात. तर शहरातील पाणीपुरवठा देखील नेहमीच विस्कळीत होत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. नवीन पाणीपुरवठा जलवाहिनीचे काम सुरु आहे. मात्र ते कधीपर्यंत होईल याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे  औरंगाबादकरांचा पाणी प्रश्न नेमका कधी सुटणार याचं उत्तर मिळणं कठीण झाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Garbage Depot: औरंगाबादचा कचरा पुन्हा पेटला! तब्बल 36 तासांनंतर आगीवर नियंत्रण