Aurangabad News: फुलंब्री तालुक्यातील शेवता खुर्द व शेवता बुद्रुक या गावातील गावकऱ्यांनी केलेल्या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडल्याची परिस्थिती पाहायला मिळाली. कारण या दोन्ही गावांमधून गिरजा नदी वाहत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. अनेकवेळा निवेदने दिली मात्र याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने दोन्ही गावांच्या नागरिकांनी चक्क पूर आलेल्या नदीत उतरून जल आंदोलन केले. सुमारे अडीच तास चाललेल्या आंदोलनाकडे कोणीही फिरकले नाही. शेवटी मंडळ अधिकाऱ्याने निवेदन स्वीकारले. त्यामुळे प्रशासनाविरोधात गावकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेवता खुर्द व शेवता बुद्रुक या दोन्ही गावांमधून गिरजा नदी वाहते. गावाला नदीचे पात्र मोठे आहे. तर पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास दोन ते तीन महिने नदीचे पाणी कमी होत नाही. यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना तीन महिने शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. बहुतांशवेळा शाळा बंद ठेवण्याची वेळ येते. तर दोन्ही गावचा संपर्क तुटल्याने संपूर्ण दळणवळण बंद राहते. अनेकदा गावकरी पाण्यातून प्रवास करतात, मात्र पाण्याची पातळी वर झाली तर हा प्रवास जीवावर बेतू शकतो. अनेकदा निवेदन देऊनही कुणीच लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांनी अखेर नदी पात्रात उतरून आंदोलन केले.
तरीही सरकारी यंत्रणेला पाझर फुटला नाही...
या दोन्ही गावाचा रस्त्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. निवडणूकीत गावात येणारा प्रत्येक नेता रस्त्याचा आश्वासन देऊन जातात, मात्र रस्ता काही बनत नाही. गावकऱ्यांनी अनेक शासकीय कार्यालयाच्या खेट्या मारल्या पण त्यांनी सुद्धा प्रत्येकवेळी आश्वासन देऊन हुलकावणी दिली. विशेष म्हणजे दोन्ही गावातील गावकरी नदीला आलेल्या पाण्यात उतरले असतानाही तालुका पातळीवरील सरकारी यंत्रणेला पाझर फुटला नाही. दोन तास गावकरी, शाळकरी मुलं पाण्यात उभे होते पण कोणताही अधिकारी फिरकला नाही. अखेर गावातील नागरिकांनी मंडळ अधिकाऱ्याला निवेदन देऊन आंदोलन संपवले.
माजी विधानसभा अध्यक्षांचा मतदारसंघ...
शेवता खुर्द व शेवता बुद्रुक ही दोन्ही गावं फुलंब्री विधानसभा मतदारसंघात येतात. विशेष म्हणजे या मतदारसंघाचे नेतृत्व माजी विधानसभा अध्यक्ष तथा भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे करतात. बागडे स्वतः विधनासभा अध्यक्ष होते. गेल्या दोन वेळेपासून तेच या तालुक्याचे आमदार आहे. मात्र असे असतांना साधा रस्ता त्यांना करता आला नसल्याचा आरोप होतोय. त्यामुळे किमान आतातरी या गावचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार का? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
महत्वाच्या बातम्या...
Lumpy Skin Disease: औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लिंपीचा फैलाव, आठ जनावरांचा मृत्यू