Aurangabad News: औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, धावत्या एसटी बसचे एकामागून एक असे दोन टायर निखळून पडल्याचा प्रकार समोर आला आहे. अगोदर खड्ड्यामुळे एक टायर निखळले त्यांनतर बसचा रॉड तुटल्याने दुसराही टायर निखळून पडला. विशेष म्हणजे या बसमधून दहा ते बारा जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून, त्यांचा थोडक्यात जीव वाचला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर आगारातील बस (क्रमांक एम.एच. 20 बि. एल 2010) लासूर स्टेशन येथून जवळच असलेल्या, गवळीशीवरा गाजगाव मार्गे औरंगाबादकडे निघाली होती. दरम्यान गवळीशिवार गावाच्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्याचा चालकाला अंदाज न आल्याने बसचा मागचा टायर खड्ड्यात आदळला. मोठा खड्डा असल्याने बसचा टायर निखळून बाहेर आला.
दुसराही चाक निखळून पडला...
खड्ड्यात बस आदळल्याने मागच्या चार चाकांपैकी एक चाक निखळल्याचे बस चालकाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे एका बाजूला दोन आणि एका बाजूला एका चाकावरती बस शंभर मीटरपुढे चालत आली. मात्र मागील डाव्या बाजूच्या दोन पैकी एकच चाक उरल्याने बसचा रॉड तुटला आणि उरलेला दुसराही चाक निखळून पडला. त्यामुळे बस एका बाजूला झुकली, परंतु वेग कमी असल्याने चालकाने तात्काळ बसवर नियंत्रण मिळवत बस थांबवली.
मोठा अनर्थ टळला...
ज्या गवळीशिवार ही सर्व घटना घडली त्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर खड्डे असल्याने बसचा वेग कमी होता. मात्र हीच बस औरंगाबाद रस्त्यावर आल्यावर हा प्रकार घडला असता तर मोठी जिवंत हानी घडली असती. कारण या बसमधून तब्बल 12 प्रवाशी असल्याची माहिती समोर येत आहे. श्रावण महिना सुरु असल्याने गवळीशिवरा येथील महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. त्यातच आज शनिवार असल्याने भाविकांची गर्दी असते. त्यामुळे चालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
खड्डे बुजवण्याची मागणी...
लासूर स्टेशन ते गवळीशिवरा या रस्त्यात मोठ्याप्रमाणावर खड्डे झाल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजतं नाही. त्यातच सध्या श्रावण महिना सुरू असल्याने गवळीशिवर येथील महारुद्र मारुतीच्या दर्शनाला सध्या भाविकांचा चांगलाच ओघ वाढला आहे. शनिवारी तर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे या रस्त्यातील खड्डे बुजवण्याची मागणी भाविक वर्गातून होत आहे.