Jalna News: लग्नाची सोयरीक जमावी म्हणून कोण काय करेल याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. आता असाच एक प्रकार जालना जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. चांगली मुलगी आणि लवकर सोयरीक मिळावी म्हणून एका दुकानदार तरुणाने भन्नाट डोकं लावले. आपल्याला राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले असून, राज्यकर निरीक्षक,राज्यकर उपायुक्त पदावर नियुक्ती होणार असल्याचा बनाव केला. मात्र एका अधिकाऱ्याला संशय आला आणि बनाव करणाऱ्या तरुणाचा भांडाफोड झाला. रामेश्वर पंढरीनाथ लोखंडे असे या तरुणाचे नाव आहे. 


त्याच झालं असं की, रामेश्वर हा किराणा दुकान चालवायचा. सोबतच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुद्धा करायचा. दरम्यान तो लग्नासाठी सोयरीक शोधत होता. मात्र सोयरीक जमत नव्हती. त्यामुळे रामेश्वरने शक्कल लढवली आणि 11 नोव्हेंबरला राज्यकर सहआयुक्ताने प्रसिद्ध केलेल्या निवड यादीत खाडाखोड करून स्वतःचे नाव टाकले. आपली निवड झाल्याच्या त्याच्या दाव्यानंतर गावोगावी त्याचे स्वागत करण्यात आले. सोशल मीडियावर रामेश्वरच्या यशोगाथाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले.


अन् भांडाफोड झाला...


रामेश्वरने राज्यकर निरीक्षक, राज्यकर उपायुक्त पदासाठी यश मिळवल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्याच्या यशोगाथाच्या व्हिडिओ क्लिप पंचक्रोशीत फिरू लागल्या. याचवेळी एका वस्तू कर निरीक्षकाला संशय आल्याने त्यांनी तेट रामेश्वरला विचारपूस केली. यावेळी रामेश्वर खोटं बोलत असल्याच लक्षात आले आणि त्यांनी त्याची कानउघाडणी केली. त्यांच्या याच संभाषणाची क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आणि रामेश्वरचा भांडाफोड झाला. 


पोलिसात गुन्हा दाखल...


रामेश्वरच्या बनावाची माहिती मिळताच राज्य लोकसेवा आयोगाने त्याला नोटीस पाठवत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर जालना जिल्ह्याचे राज्यकर निरीक्षक गणेश संगम यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रामेश्वरच्या विरोधात भोकरदन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकारी झाल्याचा खोटा बनाव रामेश्वरच्या चांगलाच अंगलट आले असून, आलेल्या सोयरीकही गेल्या आणि पोलीस कोठडीत जाण्याची सुद्धा वेळ आली.