Aurangabad Accident News: शेतातून मजुरी करून घरी परतणाऱ्या दोन महिलांना भरधाव जाणाऱ्या टेम्पोने चिरडल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही महिला नात्याने चुलती-पुतणी होत्या. वैजापूर तालुक्यातील ही घटना असून, ठगनबाई विश्वनाथ दवंगे (56), मंगल आसाराम दवंगे (38, दोघी रा. मनूर) असे अपघातात ठार झालेल्या चुलती पुतणीचे नावे आहेत.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघी चुलती पुतणी शेतातून मजुरी करून घराकडे पायी परतत होत्या. साकेगावहून मनूरकडे जाणाऱ्या टेम्पोने (एमएच 21 डी 9116) त्यांना जोराची धडक दिली. या घटनेत दोघीही चिरडून जागीच ठार झाल्या. अपघातानंतर चालकाने वाहन जागेवर सोडून पोबारा केला. 


परिसरात हळहळ 


या अपघातात मयत झालेल्या ठगणबाई दवंगे यांच्या पतीचे यापूर्वी निधन झालेले आहे. त्यांना दोन अविवाहित मुले आहेत. अत्यंत गरीब परिस्थिती असल्याने त्या मोलमजुरी करून मुलांचे पालनपोषण करीत होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे वडिलांनंतर आईचेही छत्र हरविल्याने दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. तर अपघातातील दुसरी मयत महिला मंगलबाई दवंगे यांना पती नांदवत नसल्याने त्या माहेरी राहून मोलमजुरी करीत होत्या. दोघींच्याही मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


पोलिसांची घटनास्थळी धाव...


अपघाताची माहिती मिळताच शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन दोघींचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तसेच फरार चालकाचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी दिली आहे.


पिकअपला दुचाकी धडकून दोन जखमी


दुसऱ्या एका अपघातात औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील जुने कायगाव येथे भरधाव पिकअपने अचानक ब्रेक मारला. यामुळे पाठीमागून आलेली दुचाकी पिकअपवर धडकल्याने दोन जण जखमी झाले आहेत.  शरद गंगावणे हे पत्नीसह औरंगाबादकडे दुचाकीवर जात होते. जुने कायगाव येथे येताच समोर चालणाऱ्या पिकअपच्या चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे पाठीमागून येणारी गंगावणे यांची दुचाकी पिकअपवर धडकली. यात शरद गंगावणे व त्यांची पत्नी जखमी झाले आहेत.