Measles Disease: मुंबईपाठोपाठ औरंगाबाद शहरातही गोवरचा (Measles Disease) धोका वाढतांना पाहायला मिळत आहे. कारण यापूर्वीच जिल्ह्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असतानाच, आता आणखी आठ संशयित बालके आढळून आली आहेत. तर या संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला (Mumbai) पाठविले जाणार आहेत. याआधी शहरातील 29 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. सद्यस्थिती शहरातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, ग्रामीण भागातील एका बालकाला गोवरची लागण झाली आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात गोवरचे रुग्ण आढळून येताच आरोग्य विभाग (Health Department) खडबडून जागे झाले आहे. आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. तर संशयीत रुग्णाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहे. दुसरीकडे शहरात ताप, सर्दी, खोकला आणि अंगावर पुरळ दिसून येत असल्याने अनेक बालके उपचारासाठी दवाखान्यांत येत आहेत. म्हणून महापालिकेकडून गोवर साथीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रात बालकांचे लसीकरण केले जात आहे. ज्या बालकांनी गोवरची एकही डोस घेतलेली नसेल अशा बालकांना डोस दिले जात आहे. तसेच पहिला डोस घेतलेल्या बालकांनादुसरा डोस देण्यात येत आहे. 


'या' भागात आढळून आले संशयीत रुग्ण...


शहरातील गोवर परिस्थितीवर माध्यमांना माहिती देतांना महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, शहरात गोवरची साथ सुरू असली, तरी ती नियंत्रणात आहे. शहरात सुरू असलेल्या घरोघरी जाऊन सर्वेक्षणात शनिवारी आणखी 8 बालके संशयित आढळून आली आहेत. यामध्ये चिकलठाणा-2, विजयनगर- 2, सिडको एन- 11 इथे एक यासह इतर भागातील बालक आहेत. या बालकांना ताप, सर्दी, खोकला असून त्यांच्या अंगावर पुरळ आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या आठ बालकांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते मुंबईच्या हाफकीन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. 


औरंगाबाद महानगरपालिकेमार्फत उपाययोजना 



  • शताब्दी नगर भागात विषेश लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते, या विषेश लसीकरण सत्रात 10 बालकांचे लसीकरण करण्यात आले असुन त्यापैकी 03 बालकांना गोवरची लस देण्यात आली.

  • शताब्दी नगर भागात सर्व्हेक्षण करणे करीता 8 टिम अतिरिक्त वाढवुन एकुण 13 टीमव्दारे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.

  • संशयित गोवर रुग्णांना जिवनसत्व अ चे दोन डोस देण्यात येत आहे व त्यांना प्राथमिक उपचाराकरीता आरोग्य केंद्रात संदर्भित करण्यात येत आहे.

  • शताब्दी नगर भागात गोवर संसर्गजन्य आजाराची लक्षणे व त्या बाबत घ्यावयाची काळजी व आजारास प्रतिबंध करणे बाबत याचे बॅनर प्रदर्शित करण्यात आले असुन नागरिकांमध्ये जनजागरण करण्यात येत आहे.

  • शहरात जोखीमग्रस्त भागात 23 अतिरिक्त लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे. व त्या मध्ये लसीकरण अपूर्ण असलेल्या बालकांचे लसीकरण पुर्ण करण्यात येत आहे.

  • महापालिकेच्या आरोग्य केंद्रात बालकांची तपासणी केली जात आहे.

  • गोवर साथीची संशयित बालके तपासणीसाठी आल्यास त्यांच्यावर आशा वर्कर्समार्फत लक्ष ठेवले जात आहे. 


Measles Disease: चिंता वाढली! औरंगाबादमध्ये आणखी एक बालक गोवर पॉझिटिव्ह, हाय रिस्क भागात लसीकरण मोहीम