Aurangabad News: दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) आपल्या वैजापूर मतदारसंघात एका कार्यक्रमात गेले असता, ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या जोरदार घोषणाबाजीनंतर दोन्ही गट आमनेसामने आले होते. तर याप्रकरणी बोरनारे यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे अखेर पोलिसांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना शहरातील एका लॉजमधून अटक केली आहे. राजू गलांडे आणि योगेश मोहिते (दोघे रा. महालगाव, वैजापूर) असे या दोन्ही कार्यकर्त्यांचे नावं आहेत. तर दुसरीकडे बोरनारे यांच्या भावासह 12 समर्थकांच्या विरोधात ठाकरे गटाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


आमदार बोरनारे यांचे समर्थक महेश बुणगे यांनी वैजापूर पोलिसात 10 ते 12 जणांच्या विरोधात वीरगाव पोलिसात तक्रार दिली होती. ज्यात ठाकरे गटाच्या राजू गलांडे आणि योगेश मोहिते यांच्यासह काही लोकांनी बोरनारे यांचा ताफा अडवून हातात दांडे घेऊन काळे झेंडे दाखवले. तसेच बोरनारे यांच्यावर अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न देखील केल्याचा म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी महेश बुणगे यांच्या तक्रारीवरून राजू गलांडे आणि योगेश मोहिते यांच्यासह 10 ते 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. 


लॉजमधून केली अटक


आमदार बोरनारे यांचे समर्थक महेश बुणगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच, राजू गलांडे आणि योगेश मोहिते फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. दरम्यान हे दोन्ही आरोपी शहरातील एका लॉजमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे वीरगाव पोलिसांचे एक पथक तत्काळ रवाना झाला आणि दोघांनाही अखेर लॉजमधून अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


काय आहे नेमकं प्रकरण...


गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी ज्याप्रमाणे शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद सुरु आहे, तसाच वाद वैजापूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे शुक्रवारी 25 नोव्हेंबरला मतदारसंघातील महालगावात एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी हातात दांडे घेऊन आणि काळे झेंडे दाखवत बोरनारे यांच्याविरुद्ध 'पन्नास खोके, एकदम ओक्के' अशा घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी बोरनारे यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुरक्षीतपणे तेथून काढले होते. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


बोरनारे यांच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल... 


तर ज्याप्रमाणे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे बोरनारे यांच्या भावासह 12 समर्थकांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास विठ्ठल जाधव यांच्या तक्रारीवरून आमदार बोरनारेंचे धाकटे बंधू संजय बोरनारे, महेश बुनगे या दोघांसह 12 जणांविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे