Aurangabad Crime News : औरंगाबादमध्ये एका 35 वर्षीय व्यक्तीला मित्रांनी हॉटेलमध्ये जेवणाची दिलेली ऑफर चांगलीच महागात पडली आहे. कारण सहज भेट झाल्यावर या तरुणाला मित्रांनी हॉटेलवर जेवायला नेले. मात्र तेथे बिलावरून वाद होताच त्याचे अपहरण करून, त्याला आडगावच्या जंगलात नेऊन बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोईन खान दिलावर खान (35, रा देवळाई) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर भाऊसाहेब विनायक चव्हाण, शेषराव गोविंद राठोड (दोघे रा. भिंदोन तांडा, ता. औरंगाबाद) व अन्य पाच ते सहा जणांचा मारहाण करणाऱ्या आरोपींमध्ये समावेश आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोईन खान हा 27 ऑगस्टला सकाळी दहा वाजता दुचाकीने गाडीवाट येथील शेतात गेला होता. शेतात काम आटोपल्यावर तो पुन्हा दुचाकीने घराकडे निघाला. याचवेळी भिंदोन तांड्याजवळ त्याच्या ओळखीचे भाऊसाहेब चव्हाण आणि शेषराव राठोड दिसल्यावर तो थांबला. तिघांमध्ये बऱ्याचवेळ गप्पा झाल्यानंतर जेवणासाठी जाण्याचं ठरले. त्यामुळे चव्हाण व राठोडने मोईन खानला भिंदोन फाट्याजवळील हॉटेलवर जेवायला नेले. 


बिलावरून सुरु झाला वाद...


चव्हाण व राठोड यांच्यासह मोईन जेवणासाठी हॉटेलमध्ये पोहचले. यावेळी तिघांनी मनसोक्त पोटभर जेवणं केलं. मात्र याचवेळी जेवण झाल्यावर बिलावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद वाढत गेला आणि त्यांच्यात जोरदार भांडण सुरु झाले. दरम्यान चव्हाणने फोन करून ओळखीच्या काही लोकांना बोलावून घेतले. चव्हाण व राठोड यांच्यासह यावेळी आलेल्या पाच-सहा जणांनी मोईन खानला बळजबरी बोलेरोमध्ये बसविले आणि अपहरण करून आडगावच्या जंगलात नेले. तेथे त्याला पुन्हा लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. तो बेशुद्ध पडल्यानंतर सर्वजण पसार झाले. 


पोलिसात गुन्हा दाखल


अंदाजे सहा वाजता मोईन खानला शुद्ध आली. त्यानंतर तो कसाबसा चालत रस्त्यावर आला. दरम्यान, त्याचा भाऊ नजीर खान व अलीम खान हे त्याला शोधत त्या भागात गेल्यावर त्यांची भेट झाली. त्यांनी मोईनला चिकलठाणा पोलिस ठाण्यात नेले. तेथून त्याला दवाखान्यात नेऊन उपचार केले. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तरुणांवर चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: ढाब्यावर दारू पिण्यासाठी बसणं पडलं महागात, न्यायालयाने थेट सुनावली कारवासाची शिक्षा


Aurangabad: पोलिसांची दुचाकी चोरांविरोधात मोठी कारवाई; गुन्ह्यातील 6 मोटारसायकल जप्त