Tomato News: सुरवातीला अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना  आता भाजी-पाल्यांचे दर पडल्याने आर्थिक फटका बसत आहे. कारण टोमॅटोला (Tomato) योग्य दर मिळत नसल्याने  रस्त्यावर फेकण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) वडजी गावातील एका तरुण शेतकऱ्याने टोमॅटोला बाजारात भाव न मिळाल्याने ते अक्षरशः रस्त्यावर फेकून दिले आहे. या तरुणाचा व्हिडिओ (Video) देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील वडजी गावातील कैलास बोंबले या तरुण शेतकऱ्याने आपल्या एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. दरम्यान आज टोमॅटोचा पहिला लॉट निघाल्याने त्यांनी पैठणच्या बाजारात टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी 20 ते 22 किलोच्या टोमॅटोच्या कॅरेटला 30 ते 50 रुपयांचा भाव मिळत असल्याचं कळताच त्यांनी अर्ध्या रस्त्यातच टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. त्यामुळे गाडी भाडं देखील त्यांना खिशातून भरावे लागले. 


40 पैसे किलोचा भाव...


औरंगाबादच्या वडजी गावातील कैलास बोंबले या तरुण शेतकऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात टोमॅटोला योग्य दर न मिळाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकताना पाहायला मिळत आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटला सद्या बाजारात 30 ते 50 रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच 40 पैसे किलो असा भाव टोमॅटोला मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. 


शेतकरी पुन्हा संकटात... 


यावर्षी सुरवातीलाच अतिवृष्टी झाल्याने पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यातच जी उरलीसुरली पीक आहेत त्यांचं परतीच्या पावसात होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे खरीप हंगाम जवळपास हातून गेलं आहे. अशात शेतकऱ्यांनी कसेबसे वाचवलेल्या पालेभाज्यातून याची भरपाई भरून निघेल अशी अपेक्षा असतानाच अचानक दर कोसळत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना तर याचा अधिक फटका बसला आहे. त्यामुळे आता शेतात असलेल्या पीकाला बाजारात भाव मिळत नसल्याने त्यावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ बळीराजावर आली आहे. 


लावलेला खर्चही निघेना.. 


कैलास यांनी आपल्या वडजी गावातील एक एकरमध्ये टोमॅटो लावला होता. यासाठी त्यांना एकरी 50 ते 60 हजारांचा खर्च आला आहे. त्यात दिवस-रात्र कष्ट करत पीकाला जगवल. दिवसा वीज नसल्याने रात्रीचं पाणी भरलं. पण जेव्हा टोमॅटो बाजारात विक्रीसाठी आले तेव्हा दर अचानक कोसळले. त्यामुळे दोन पैसे मिळण्याची अपेक्षाभंग तर झालीच पण लावलेला खर्च देखील निघणार नसल्याची परिस्थिती आहे. 


Crop Cultivation : यंदा देशात गव्हाच्या लागवडीत वाढ, मात्र 'या' राज्यांमध्ये घट; वाचा सविस्तर....