Marathwada Rain News: रविवारी मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असतांना, आणखी तीन दिवस पावसाचा मराठवाड्यात मुक्काम असणार आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आधीच ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली असतांना, आता पुन्हा तीन दिवस पाऊस बरसणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 8 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर 9 ऑगस्ट रोजी जालना, औरंगाबाद, हिंगोली, व परभणी जिल्ह्यात तर 10 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
असा बरसला पाऊस...
हिंगोली जिल्ह्यात रविवारी शहर आणि ग्रामीण भागात दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. तासभर चालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नदी नाल्यातून पाणी वाहतांना पाहायला मिळाले. सोबतच लातूर जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. दुपारच्या सुमारास तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी असल्याचे चित्र होते.
उस्मानाबाद जिल्ह्यात सुद्धा रविवारी चांगला पाऊस झाला असून, दुपारी तीन वाजेच्यानंतर जोरदार सरी बरसल्या आहेत. त्यामुळे शहरातील नाले ओसंडून वाहतांना पाहायला मिळाले. सोबतच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा हलक्या सरी पाहायला मिळाल्या. तर दुपारी चार वाजेच्या नंतर नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढला होता.
औरंगाबादच्या हिंगोनी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस
औरंगाबाद जिल्ह्यात रात्री 9 वाजेनंतर अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे. तर शहरात सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वैजापूर तालुक्यातील हिंगोनी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. गावात गुडगाभर पाणी तुंबले होते. तर नदी नाल्यांना पूर आल्याची परिस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून, पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.