Aurangabad Accident News : औरंगाबाद बिडकीन-शेकटा रोडवर झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास बिडकीन जवळील शेकटा रोडवरील खताच्या कंपनीसमोर दुचाकी (MH 20 GB 8483), (MH 23 R 9968) जात असतांना हायवा ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन युवक जागेवरच ठार झाले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दत्तात्रय कैलास गावंडे (वय 30 वर्षे, रा.पिशोर,ता.कन्नड), ज्ञानेश्वर उबाळे ( वय 30 वर्षे, रा. अंधारी, तालुका सिल्लोड), गजानन विश्वनाथ बडक (वय 20 वर्षे, पळशी, तालुका सिल्लोड) असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील तिघेही तरुण हे बिडकीन जवळील एका खासगी कंपनीतील कामागार असुन शिफ्ट सुटल्यानंतर दोन वेगवेगळ्या दुचाकीवरून घरी निघाले होते. दरम्यान याचवेळी तेथून जाणाऱ्या हायवा ट्रकने दोन्ही मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तात्काळ औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना त्याचा त्याचाही मृत्यू झाला आहे.  


घटनास्थळी पोलीस दाखल...


बिडकीन-शेकटा रोडवर अपघात झाल्याची माहिती मिळताच आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर याची माहिती बिडकीन पोलिसांना देण्यात आली. महिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमी तरुणाला रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी औरंगाबाद शहरात पाठवले. मात्र त्याचाही उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे.