Aurangabad News: औरंगाबाद शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी नसल्याने या शहराची चर्चा राज्यभरात झाली होती. मात्र याचवेळी शहराचे आयुक्त मात्र शासकीय पैशांची उधळपट्टी करत असल्याचं समोर आले आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीचे तत्कालीन सीईओ तथा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी शासकीय पैशांची स्वत:साठी उधळपट्टी केल्याचा आरोप होतोय. विशेष म्हणजे पांडेय यांच्या काळात करण्यात आलेल्या उधळपट्टीची यादीच आता बाहेर आली आहे. 

फाइव्हस्टार हॉटेलात मुक्काम

आस्तिककुमार पांडेय यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे. त्यांच्यावर नेहमीच वेगवेगळे आरोप झाले आहेत. शासकीय पैसे त्यांनी आपल्या स्वतःच्या गोष्टींसाठी वापरल्याचाही आरोप झाले आहेत. त्यातच शासकीय बैठकीसाठी मुंबई दौरे करताना शासकीय गेस्टहाऊसचा वापर टाळून फाइव्हस्टार हॉटेलात मुक्काम करत हजारो रुपये खर्च केल्याचे सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे आस्तिककुमार पांडेय यांच्या काळातील निधी कुठे वापरला याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

पांडेय यांनी शासकीय पैशांची कशी उधळपट्टी केली पाहू यात..

दिनांक  वस्तू  किंमत 
13 ऑगस्ट 2020   आयपॅड प्रो  1.72 लाख सीईओंसाठी 
4 सप्टेंबर 2020   आयपॅड प्रो 11 इंच, फोलिओ कीबोर्ड 1.36 लाख 
15 सप्टेंबर 2020   वन प्लस प्रो  55 हजार 
23 नोव्हेंबर 2020  लॅपटॉप   50 हजार पोलीस कंट्रोल रूमसाठी 
तारीख उपलब्ध नाही   आयपॅड प्रो,स्मार्ट पेन्सिल कीबोर्ड, फॉलिओ   1.24 लाख 
25 नोव्हेंबर 2020 सॅमसंग मोबाईल आणि घडी   2.30 लाख 

पांडेय यांच्या काळातील कामांना ब्रेक...

आस्तिककुमार पांडेय यांच्या काळात महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी अंर्तगत अनेक कामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र बजेट नसतानाही या कामांना मंजुरी देण्यात आल्याचे आता त्यांच्या बदलीनंतर समोर आले आहे. त्यामुळे पांडेय यांच्या काळातील अनेक कामांना नवीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ब्रेक लावला आहे. त्यामुळे बजेट नसतांना विकास कामांना पांडेय यांनी कशामुळे मंजुरी दिली होती याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.