Aurangabad Crime News: मुलींची छेड काढत असतांना त्यांना मदतीला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची ओळख पटली असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी आणि परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना शोधून काढले आहे. संदीप ज्योतीराम चव्हाण (32, रा. गांधीनगर), विकी नरसिंह रिडलोन (33, रा. गांधीनगर), हरिष अशोक चौधरी ( रा.बापूनगर) असे या आरोपींची नावे आहेत. बेगमपुरा पोलीसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे. तर सचिन मधुकर म्हस्के (वय 32 वर्षे, रा. पेठेनगर निसर्ग कॉलनी) असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मस्के हे औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. दरम्यान नेहमीप्रमाणे ते आपल्या घरून पोलीस मुख्यालय येथे हजेरीसाठी जात होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतीगृहाजवळ तिन मुली त्यांच्याजवळ आल्यात. तसेच आम्हाला काही गुंड स्वरूपाचे मुलं मारहाण करत असून, आमची गाडी सुद्धा त्यांच्याजवळ असल्याचं म्हणाल्यात. त्यामुळे मस्के यांनी मदतीसाठी 112 नंबर डायल करण्याचा त्यांना सल्ला दिला. तेवढ्यात मारहाण करणारी मुले सुद्धा तिथे पोहचली.
मस्के यांना बेदम मारहाण...
सचिन मस्के मुलींशी बोलत असतानाच तिथे त्या मुलींना मारहाण करणारे मुलेही पोहचले. तसेच या मुलींना तू मदत करणार का आणि पोलिसांना फोन करायला सांगतो का? म्हणत मारहाण करायला लागले. यावेळी आपण पोलीस असल्याच मस्के यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्यांना मारहाण सुरूच होती. मस्के यांना खालीपाडून लाथा बुक्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे मस्के यांनी कशीबशी आपली सुटका करून तेथून पळ काढत बेगमपुरा पोलीस स्टेशन गाठलं.
Aurangabad: मुलींच्या मदतीला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला गुंडांकडून मारहाण; गुन्हा मात्र....
सीसीटीव्ही फुटेज तपासून शोधले आरोपी...
सचिन मस्के यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात होता. यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ आणि त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी एका दुचाकीवरून तिघे जातांना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी सचिन मस्के यांच्याकडून हेच आरोपी आहे का याची खात्री केली असता त्यांनी मारहाण करणारे हेच असल्याचं सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीच्या नंबरवरून तिन्ही आरोपींना शोधून काढत ताब्यात घेतले आहे. तसेच तिघांनी मारहाण केल्याचा गुन्ह्याची कबुली दिली असल्याचं सुध्दा पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे.