Aurangabad Burning Bike VIDEO: औरंगाबादच्या खुलताबाद शहरातील एका चौकात चालत्या इलेक्ट्रिक बाईकने पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे गाडीला आग लागल्याची बाब दुचाकीस्वाराच्या वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेत इलेक्ट्रिक बाईक पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तर या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, खुलताबाद शहरातील हाफिज खलील चौक येथील रहिवासी मनोज बारगळ हे त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीने शेतातून गावात येत होते. यावेळी शहरातील बॉम्बे हॉटेलजवळ आल्यावर त्यांना आपल्या इलेक्ट्रिक बाईकमधून जळाल्याचा वास येऊ लागला. त्यामुळे त्यांनी खाली उतरून पाहणी केली असता, गाडीत आग लागली होती. पाहता-पाहता आगीने मोठा भडका घेतला. 






दुचाकी काही क्षणात जळून खाक...


इलेक्ट्रिक बाईकमधून वास आल्याने काहीतरी गडबड असल्याचा संशय मनोज बारगळ यांना आला. त्यामुळे ते खाली उतरून पाहत असतानाच गाडीने मोठा पेट घेतला. गाडी विझवण्यासाठी काही प्रयत्न करण्यापूर्वीच आगीने मोठा भडका घेतला. त्यामुळे काही क्षणात इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाली. तर मनोज बारगळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 


नागरिकांची गर्दी...


खुलताबाद शहरातील बॉम्बे हॉटेल परिसरात नेहमीच गर्दी असते. त्यामुळे मनोज बारगळ यांच्या इलेक्ट्रिक बाईकला आग लागताच पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. चालत्या गाडीने अचानक पेट घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तर काहींनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुद्धा केला. पण आगीचा भडका अधिक असल्याने आग वीजवने शक्य नव्हते. 


दोन दिवसांपूर्वी एसटी बसला आग...


इलेक्ट्रिक बाईकला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मात्र अशीच घटना दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील ढोरेगाव येथे समोर आली होती. एका चालत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेत बारा ते पंधरा प्रवाशांना बाहेर काढले. यावेळी लागलेल्या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: कंटेनर चालकाची नियत फिरली, 20 लाखांच्या व्हिस्कीसह ट्रकच पळवला


Aurangabad:काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, पोलीस आयुक्तालयाच्या बाजूलाच सुरु होता अड्डा