Aurangabad News: राज्यातील पहिली अग्निवीर भरती प्रकिया शनिवारपासून औरंगाबाद येथून सुरु झाली आहे. एकूण सात जिल्ह्यातील तरुणांसाठी औरंगाबादमध्ये रिक्रूटमेंट विभागाअंतर्गत ही भरती प्रकिया राबवली जात आहे. मात्र या भरतीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून शहरात आलेल्या तरुणांचे प्रचंड हाल होत आहे. राहण्यासाठी सोय नसल्याने मिळेल तिथे झोपून रात्र काढावी लागत असून, पिण्यासाठी पाणी सुद्धा मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 


अग्निवीर होण्याच्या अपेक्षा घेऊन औरंगाबादसह एकूण सात जिल्ह्यातील तरून शनिवारपासून औरंगाबादमध्ये दाखल होतांना पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील तब्बल 76 हजार तरुणांनी यासाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. मात्र भरतीसाठी आलेल्या तरुणांची कोणतेही राहण्याची सोय नसल्याने त्यांना रस्त्यावर,मंदिरांच्या समोर झोपण्याची वेळ आली आहे.तर पिण्यासाठी पाणी सुद्धा मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. उद्या हेच अग्नीवर आपल्या सीमेवर देशाचे रक्षण करणार आहेत. मात्र आज त्यांना पिण्याच पाणी सुद्धा मिळत नसल्याने यापेक्षा दुर्देवी गोष्ट काय असेल. 


भरतीची सुरवात औरंगाबादपासून...


अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन या पदांसाठी पुढील चार महिन्यांत महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दादरा, दमण, दीव आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांमध्ये अग्निवीर महिला मिलिटरी पोलिसांच्या टप्या-टप्याने एकूण आठ टप्प्यात भरती आयोजित केल्या जाणार आहे. महाराष्ट्रात औरंगाबादपासून याची सुरवात झाली आहे. शनिवारपासून औरंगाबादमध्ये भरती प्रक्रिया सुरु आहे. 


पैश्यांचीही लुट...


औरंगाबाद येथे होत असलेल्या अग्निवीरच्या भरतीसाठी आलेले बहुतांश मुलं बाहेर जिल्ह्यातील आहे. त्यामुळे येथील रस्त्यांची आणि इतर गोष्टींची त्यांना माहिती नाही. त्यामुळे रिक्षाचालकापासून तर हॉटेल चालकांपर्यंत अनेकांनी त्यांची लुट केली. विद्यापीठात जाण्यासाठी एरवी 60-70 भाडं लागतात, मात्र रिक्षाचालकांनी भरतीसाठी आलेल्या तरुणांकडून शंभर ते दीडशे रुपये घेतले. हॉटेल चालकांनी जेवणासाठी  जिथे शंभर रुपये लागतात तिथे तीनशे रुपये घेतल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. 


मंदिरे फुल्ल .. 


सकाळी पहाटेच भरती प्रक्रिया सुरु होत असल्याने तरुणांना एक दिवस आधीच यावे लागते. मात्र शहरात राहण्याची कोणतेही व्यवस्था नाही त्यात खिशात मोजकेच पैसे असल्याने जिथे जागा मिळेल तिथे मुलं झोपून रात्र काढत आहे. तर सोबत असलेल्या बॅगमध्ये महत्वाचे कागदपत्रे असल्याने अनेकजण सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरासमोर झोपत आहे. त्यामुळे अनेक मंदिर रात्रीच्यावेळी फुल्ल दिसत आहे.