Maharashtra Monsoon Session : उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत असून, त्यापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर विरोधी पक्षातील लोकांचे नामोहरम करण्यासाठी नोटीसा देण्याचे काम सरकारकडून सुरु असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे. अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे यांनी हे आरोप केले आहेत. 


यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, टीईटी सारख्या घोटाळ्यात ज्यांच्या नातवाईकांचे नाव समोर आले त्यांना मंत्रीपद देण्याचं काम या सरकराने केले आहे. या सरकारच्या काळात 750 असे निर्णय निघाले असून, ज्यात विकासकामांना स्थगिती देण्याचे काम या सरकराने केले आहे. तर सद्या विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचं नामोहरम करण्यासाठी त्यांना नोटीसा देणं, तडीपार करणं असे प्रकार सरकराने सुरु केले असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. 


शेतकऱ्यांच्या मदतीची फक्त घोषणाबाजी...


शेतकऱ्यांच्या बाबतीत फक्त मदतीची घोषणा करण्यात आली आहे. एनडीआरएफचे निकष पूर्णपणे कालबाह्य आहेत. समोर आलेल्या आकडेवारीनुसार विदर्भात काही शेतकऱ्यांना चारशे आणि पाचशे रुपये मदत मिळणार आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी जमीन वाहून गेली आहे. मात्र ही जमीन किती वाहून गेली याचा यापूर्वी कधीच मोजमाप झाला नाही. त्यामुळे आता हे मोजमाप कशाप्रकारे करणार आहात, त्यामुळे निकषांच्या पलीकडे जाऊन अधिकची मदत करण्याची आज गरज असल्याचं दानवे म्हणाले. 


विरोधक आक्रमक होण्याची शक्यता...


शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पहिलेच अधिवेशन होत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यात विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानभरपाईचा मुद्दा आघाडीवर राहणार आहे. त्यांनतर नवीन सरकराने अनेक विकासकामांना स्थगिती दिल्याचा मुद्दा असेल. यावरून सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्यापासून सुरु होत असलेलं अधिवेशन चांगलंच गाजण्याची शक्यता आहे. 


दानवेंचं पहिलीचं अधिवेशन...


शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यातच त्यांच्याकडे पक्षानेविधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जवाबदारी दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते झाल्यावर दानवे यांचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात त्यांच्याकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील पाणीप्रश्न, नामांतरचा मुद्दाही दानवे अधिवेशनात उपस्थित करू शकतात असे बोलले जात आहे.