Aurangabad News: औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील रेलगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचं गर्भपात (Abortion) करण्यासाठी पतीने गरजेपेक्षा जास्तीच्या गोळ्या खाऊ घातल्याने रक्तस्त्राव होऊन एका महिलेचा मृत्यू (Woman Death) झाला आहे. मंगळवारी ही घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी महिलेच्या पतीविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली बाळासाहेब क्षीरसागर (वय 30 वर्षे) असे मृत पत्नीचे नाव असून,बाळासाहेब गणपत क्षीरसागर गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब क्षीरसागर हे मजुरीचे काम करतात. त्यांना एक मुलगा, दोन मुली आहेत. दरम्यान वैशाली यांना पुन्हा एकदा चौथे अपत्य होणार होते. आपल्याला चौथे अपत्य होऊ नयेत म्हणून बाळासाहेब क्षीरसागर यांनी गर्भपाताच्या गोळ्या आणल्या होत्या. पण त्या किती खाव्यात याबाबत माहिती नसलेल्या बाळासाहेब यांनी पत्नीला आवश्यकतेपेक्षा म्हणजे 4 ते 5 गोळ्या एकच वेळेला खाऊ घातल्या. तर एकाचवेळी 4 ते 5 गोळया खाऊ घातल्याने वैशाली यांना रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे बाळासाहेब यांनी वैशाली यांना उपचारासाठी फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
उपचार सुरु असतानाच मृत्यू...
बाळासाहेब यांनी पत्नी वैशाली यांना आधी फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथून त्यांना औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात हलवण्यात आले. परंतु अधिक रक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरू असताना वैशाली यांचा मंगळवारीच मृत्यू झाला.
पोलिसात गुन्हा दाखल....
वैशाली यांच्या मृत्यू झाल्याने याप्रकरणी त्यांचे भाऊ मंगेश गोडसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारीवरून बाळासाहेब क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी बाळासाहेब यांना अटक केली आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गर्भपात करणं चुकीचं...
बेकायदेशीर गर्भपात करणे कायद्याने गुन्हा असून, याबाबत प्रशासनाकडून सतत आवाहन देखील करण्यात येते. अनेकदा लोकं घरच्या घरीच गोळ्या घेऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न करतात. मात्र याबाबत वैद्यकीय ज्ञान नसल्याने अनेकदा असे प्रकार अंगलट येतात. असाच काही प्रकार फुलंब्रीतील घटनेतून समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांच्या परवानगी शिवाय किंवा सल्ल्या न घेता अशाप्रकारे औषधे घेणं टाळल्यास मोठी जिवंतहानी टाळता येऊ शकते.
Crime Story: दिराचे झाले वहिनीवर प्रेम, पैश्यांची मागणी होताच केला तिचा गेम; औरंगाबादेतील घटना