Farmer Suicide News : सध्या अचानक कापसाच्या (cotton) दरात मोठी घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कापसाच्या दरात घसरण झाल्यामुळं एका तरुण शेतकऱ्यानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Farmer Suicide ) केल्याची घटना घडली. ही घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एकतुनी इथं घडली. विलास दादाराव गोरे (27) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.  


शेतीसाठी घेतलं होतं कर्ज 


विलास गोरे यांनी कापसाला चांगला भाव मिळेल या आशेपोटी दोन एकर क्षेत्रावर कापूस लावला होता. मशागत आणि रासायनिक खतासाठी काही सावकारी कर्ज घेतले होते. डिसेंबर संपत आला तरी कापसाला चांगला भाव मिळाला नाही. त्यामुळं विलास गोरे यांनी बुधवारी (21 डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विलास यांचा विवाह झालेला नव्हता. विलास गोरे यांच्या आत्महत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


कापसाच्या दरात हजार रुपयाची घसरण 


कापसाला प्रतिक्विंटल शासकीय हमीभाव हा 6 हजार 380 रुपये दिला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस देणं पसंत केले. खासगी व्यापारी आठ दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल 8 हजार 500 ते 8 हजार 900 रुपयांपर्यंत दर देत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात हा दर कमी झाल्याने तीन दिवसात हाच दर आता 7 हजार 500 ते 7 हजार 900 रुपयापर्यंत खाली आला आहे. हे दर आणखी कमी होताना दिसत आहे. 


अतिवृष्टीचा शेती पिकांना मोठा फटका


यावर्षी राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. शेतकऱ्यांच्या हाती आलेली उभी पीक या अतिवृष्टीनं वाया गेली होती. वाया गेलेल्या पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, फळबागा, भाजीपाला या पिकांचा समावेश होता. यामध्ये सर्वात मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. काही ठिकाणी तर पिकांबरोबर जमिनी देखील खरवडून गेल्या होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. अशा अतिवृष्टीच्या तडाख्यातूनही काही शेतकऱ्यांची पीक वाचली होती. ती पीक आता बाजारात विक्रीसाठी येत आहेत. मात्र, सध्या शेतीमालाला योग्य प्रकारचा दर मिळत नसल्यानं शेतकरी सकटात सापडला आहे. आधीच शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा आहे. त्यातच शेतमालाला दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. यातूनच शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं चित्र दिसत आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Farmer Suicide News : परभणीत दोन दिवसात दोन आत्महत्या, आर्थिक स्थितीमुळं 21 वर्षीय तरुणासह 52 वर्षीय शेतकऱ्यानं संपवलं जीवन