Aurangabad Water Issue: शहराला आधीच वेळेवर पाणी येत नसल्याचा तक्रारी असतानाच आता जायकवाडीहून येणारी सातशे मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी मंगळवारी रात्री बिडकीनगावाजवळ फुटली आहे. जलवाहिनीचे काम करण्यास वेळ लागत असल्याने शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला गेला असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम लगेचच हाती घेण्यात आले असले तरीही, दुरुस्तीसाठी सुमारे 30 तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे औरंगाबादकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे.
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरणातून चौदाशे मिमी आणि सातशे मिमी व्यासाच्या दोन मुख्य जलवाहिनी टाकण्यात आलेल्या आहेत. जलवाहिनी जुन्या झाल्याने अनेकदा फुटत असतात. दरम्यान यातील सातशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी मंगळवारी रात्री बिडकीनजवळ फुटली. अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता पाईप मोठ्याप्रमाणावर फुटला असल्याने तात्काळ पाणी उपसा थांबविण्यात आला.
बिडकीनजवळ फुटलेली ही वाहिनी सहा फुटांपर्यंत फुटली आहे. त्यामुळे तिच्या दुरुस्तीसाठी वेल्डिंग व ती सुस्थितीत होईपर्यंत अधिकचा वेळ लागणार आहे. गुरुवारी दुपारपर्यंत हे काम चालेल. तोपर्यंत जुनी वाहिनी पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात शहराला केवळ चौदाशे मिलिमीटर व्यासाच्या जलयोजनेतूनच पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. यामुळे नागरिकांना दोन दिवस विस्कळीत पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागणार आहे. या काळात शहरातील काही भागांत कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल, तर काही भागांचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला जाईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
महानगरपालिकेची माहिती...
याबाबत महानगरपालिकेने माहिती देतांना म्हंटले आहे की, पाणी पुरवठा विभागामार्फत दुरुस्तीचे काम त्वरीत हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती नवीन पाईप टाकून करावी लागणार असून या कामासाठी साधारणतः 24 ते 28 तासाचा कालावधी लागणार आहे. यामुळे शहरास पाणीपुरवठा करणारी जुनी योजना बंद आहे. उपरोक्त दुरुस्तीमुळे शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल किंवा काही भागाचा पाणीपुरवठा एक दिवसाने उशीरा होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
यामुळे लागतोय उशीर...
ज्याठिकाणी जलवाहिनी फुटली आहे,तिथे चिखल आहे. एका शेतातून ही जलवाहिनी गेलेली असून, दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे तिथे जेसीबी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे आधी तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. त्यात खोदकाम करतांना सुद्धा चिखल असल्याने उशीर लागला आहे.
महत्वाच्या बातम्या...
Photo: औरंगाबादेत महावितरण कार्यालयात नागरिकांचे मेणबत्या पेटवून आंदोलन
औरंगाबादकरांची चिंता वाढली! चोवीस तासांत 12 डेंग्यूसदृश रुग्ण, आरोग्य विभागात खळबळ