Sanjay Shirsat: मंत्रिपदासाठी वेटिंग लिस्टवर असलेल्या औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या नेते-उपनेतेपदी शिरसाट यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे आधीच मंत्रिपद गेले असताना पक्षातही शिरसाट यांना स्थान न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. तर आमदार संजय शिरसाट सुद्धा नाराज असल्याचे बोलले जात आहे.


मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार, नेतेपदी पाच तर 26 उपनेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहे. मात्र यामध्ये  आमदार संजय शिरसाट यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे मंत्रीपदासाठी वेटींगवर असलेल्या शिरसाटांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तर राजकीय वर्तुळात शिरसाटांच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. यावर शिरसाठ यांची मात्र अजूनही अधिकृत अशी प्रतिक्रिया आलेली नाहीये.


यांच्या नियुक्त्या....


शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेतेपदी आणि उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. ज्यात शिवसेना नेतेपदी रामदास कदम, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप जाधव, गुलाबराव पाटील यांची निवड झाली आहे. तर उपनेतेपदी 26 जणांची नेमणूक करण्यात आली. अनिल बाबर, दादाजी भुसे, गोपीकिसन बाजोरिया, श्रीरंग बारणे, ज्ञानराज चौगुले, शंभुराज देसाई, भरत गोगावले, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर,शीतल म्हात्रे, विजय नाहाटा, चिमणराव पाटील, हेमंत पाटील, शहाजीबापू पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, रवींद्र फाटक, संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत, सदा सरवणकर, राहुल शेवाळे, विजय शिवतारे, कृपाल तुमाणे, संध्या वढावकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


संजय शिरसाट नाराज?


शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या यादीत संजय शिरसाठ यांचं नाव निश्चित समजले जात होते. मात्र ऐनवेळी अब्दुल सत्तार यांचे नाव समोर आले आणि संजय शिरसाठ यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे संजय शिरसाट नाराज असल्याची अनेकदा चर्चा झाली. तर अनेक वेळा खुद्द शिरसाट यांनी जाहीरपणे मंत्री पदाची खदखद बोलून दाखवली. त्यातच आता शिरसाट यांना पक्षातील नेते-उपनेतेपदी स्थान न मिळाल्यामुळे ते पुन्हा नाराज असल्याची चर्चा आहे.


संबंधित बातम्या...


Aurangabad: मागून आलेल्या सावेंना कॅबिनेट मंत्रीपद, आमचाही...; शिरसाटांनी पुन्हा बोलून दाखवली खदखद


माझ्या आधी खैरेंचा सत्कार कसा करता म्हणत शिरसाट भरकार्यक्रमातून उठून निघाले; जलील यांनी थांबवलं