Aurangabad News: जुलै महिन्याच्या सुरवातीपासून मराठवाड्यात कोसळणारा पाऊस थांबायचं नाव घेत नाही. औरंगाबादमध्ये सुद्धा वैजापूर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने हाहाकार पाहायला मिळाला. वैजापूरच्या लाडगाव-कापूसवाडगाव शिवारात शुक्रवारी झालेल्या पावसाने नदी-नाले तुडंब भरून वाहत आहे. तर काही ठिकाणी नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद झाल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. सोबतच शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.
महसूल विभागाकडून पावसाची नोंद...
महसूल विभागाकडून पावसाची घेण्यात आलेल्या नोंदीनुसार, वैजापूर मंडळात 19 मि.मी, लाडगावमध्ये 61मि.मी, नागमठाण 49मि.मी, महालगाव 12 मि.मी, लासूरगाव 03 मि.मी, शिऊर 01 मि.मी, बोरसर 08 मि.मी, खंडाळा 15 मि.मी. पाऊस झाला. तर लोणी खुर्द व गारज मंडळ कोरडेठाक होते. तर वैजापूर तालुक्यातील 10 मंडळात आतापर्यंत 3038 एवढा पाऊस पडला आहे.
पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान...
वैजापूरच्या महालगाव शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. आधीच झालेल्या पावसामुळे पिकांची उंची घटली होती. त्यातच आता पुन्हा एकदा मोठा पाऊस झाल्याने शेतात पाणी तुंबले आहे. तर नदी काठच्या शेतातील पिकं मातीसह वाहून गेली आहेत. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पंचनामे करून, तात्काळ सरकराने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पावसाच्या आकडेवारीबाबत शंका
लाडगाव परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असतांना महसूलच्या नोंदीत फक्त 61 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतात गुडगाभर पाणी तुंबले आहे. नदी नाल्यांना अचानक पूर आला आहे. शेती जमिनी पाण्यात वाहून गेल्या आहेत. असे असतांना लाडगाव मंडळातील पावसाच्या आकडेवारीबाबत शंका व्यक्त केली जात आहे.