Samruddhi Highway: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याहस्ते समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) लोकार्पण होऊन आठवडा उलटत नाही तो भाजपच्या एका आमदाराने केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे. औरंगाबादच्या हर्सूल सावंगी येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील कोट्यवधी रुपयांच्या मुरूम, दगड, माती या गौण खनिजाचा महामार्गासाठी चोरून वापर केल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी केला आहे. तर या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील बागडे यांनी केली आहे. तर हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नही उपस्थित केला असल्याचं बागडे म्हणाले. 


याबाबत बोलतांना आमदार बागडे म्हणाले की, हर्सूल सावंगी येथे देवगिरी सहकारी साखर कारखान्याने  गट नबर 41,43.44,46,47 आणि 54 जमीन घेतली होती. सर्व मिळून जवळपास 54 हेक्टर ही जमीन होती.यातील 20 एकर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली आणि त्याचे 27 कोटी रुपये देखील कारखान्याला मिळाले. मात्र असे असतांना उर्वरित जमिनीवरून देखील गौण खनिजाचा वापर करण्यात आला. त्याचा समृद्धी महामार्गासाठी वापर झाला की आणखी कुठे नेण्यात आला याचा पत्ताच नाही. सगळी जमीन खोदून टाकली आहे. तर सप्टेंबर 2021 ला याबाबत आमच्या लोकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देखील केली होती. मात्र पुढे त्याबद्दल कोणतेही कारवाई झाला नसल्याचा आरोप देखील आमदार बागडे यांनी केला आहे. 


बागडेंची मागणी... 



  • जवळपास 80 ते 90 एकर जमीन पूर्णपणे खराब झाली आहे. 

  • जिल्हाधिकारी आणि शासनाने या प्रकरणात लक्ष दिले पाहिजे.

  • खोदून ठेवलेल्या मुरुमाचा मोबदला साखर कारखान्याला मिळाला पाहिजे.

  • खोदून ठेवलेल्या जमिनीचं सपाटीकरण करून देण्यात यावा. 

  • हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नही उपस्थित करणार असल्याचा इशारा आमदार बागडे यांनी दिला आहे. 


बागडेंच्या आरोपाने खळबळ... 


आठवडाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले. मात्र या घटनेला आठवडा उलटत नाही तो आमदार बागडे यांनी केलेल्या आरोपांवरून खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता बागडे यांच्या या आरोपावरून प्रशासन किंवा सरकारकडून काही निर्णय घेतला जातो का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


बागडेंची स्वतः पाहणी...


हर्सूल सावंगी भागातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील कोट्यवधी रुपयांच्या मुरूम, दगड, माती या गौण खनिजाची चोरी झाल्यावर खुद्द आमदार हरिभाऊ बागडे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी चोरी गेलेल्या गौण खनिजाबाबत पदाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. तसेच याबाबत कारवाई करण्याची मागणी देखील केली.