Aurangabad News: औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, सांडपाण्यावरून झालेल्या वादातून थेट एकावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला आहे. 13 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, 15 डिसेंबरला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दोन जण अजूनही फरार आहेत. राहुल ज्ञानेश्वर वालतुरे (वय 30 वर्षे) यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून, हरी ऊर्फ हरीश विठ्ठल वालतुरे (वय 34, रा. नेवरगाव) असे गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव आहे.
याप्रकरणी राहुल ज्ञानेश्वर वालतुरे (वय 30 वर्षे) यांनी गंगापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी आरोपी हरी वालतुरे आणि त्यांच्यात सांडपाण्यावरून वाद झाला होता. रस्त्यावर पाणी सोडू नको, आम्हाला जाण्या-येण्यास त्रास होतो, असे राहुल यांनी आरोपी हरीला समजावून सांगत असताना त्याने राहुल यांना मारहाण करून शिवीगाळ केली. वाद वाढत असल्याने आजूबाजूच्या लोकांनी दोघांचे भांडण सोडविले.
थेट गोळीबार केला...
दरम्यान त्याच दिवशी रात्री अकरा वाजता राहुल हे गावातील बजरंग चौकात चुलत्याच्या दुकानात बसले होते. यावेळी तिथे आरोपी हरीश दुचाकीवर त्याच्या दोन साथीदारांसह तिथे आला व त्याने गावठी कट्टयातून राहुल यांच्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या घटनेनं राहुल प्रचंड घाबरले आणि त्यांनी कसाबसा आपला जीव वाचवला. त्यानंतर राहुल यांच्या फिर्यादीवरून आरोपी हरी ऊर्फ हरीश विठ्ठल वालतुरे (वय 34, रा. नेवरगाव) व त्याच्या इतर दोन साथीदारांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न व सशस्त्र अधिनियमान्वये गुरुवारी रात्री गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी हरीश यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तीन दिवसांची पोलिस कोठडी
गंगापूरच्या नेवरगाव येथील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी हरी वालतुरे याला अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी दुपारी गंगापूर येथील न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता ज्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आला, त्या बंदुकीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहेत. तसेच या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असल्याने त्यांचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे.