Lumpy Skin Disease: राजस्थानसह देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या जनावरांमधील लम्पी आजार महाराष्ट्रातील गोवंशीय जनावरांमध्ये सुद्धा आढळून आला आहे. त्यामुळे प्रशासनाने जनावरांना लसीकरण (Lumpy Skin Disease Vaccine) करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांना सुद्धा लम्पी त्वचा रोगापासून संरक्षण देण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. मात्र अद्यापही सुमारे वीस हजार जनावरं लसीकरणापासून वंचित असताना, जिल्ह्याला मिळालेला लसींचा साठा संपला आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम रखडण्याची शक्यता आहे.


जिल्ह्यात एकूण गोवंश पशुधनांची संख्या 5 लाख 38 हजार 572 आहे. लम्पीचा फैलाव लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्याला एकूण 5  लाख 22  हजार लसींचा साठा उपलब्ध करून दिला होता. दरम्यान 7 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील 5 लाख 18 हजार 923जनावरांचे लसीकरण झाले आहे. हे प्रमाण 97  टक्के आहे. जिल्ह्यात अद्यापही सुमारे 20  हजार जनावरे लसीकरणापासून वंचित आहेत. आता प्रशासनाकडे उरलेला लसीचा साठा कधी प्राप्त होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे. 


आतापर्यंत जिल्ह्यातील औरंगाबाद, सोयगाव, कन्नड, सिल्लोड, आणि खुलताबाद या 5  तालुक्यांत लसीकरण पूर्ण झालेले आहे. तर गंगापूर, पैठण, फुलंब्री आणि वैजापूर या तालुक्यांमध्ये लसीकरण अद्यापही बाकी आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये लम्पीचा जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढला आहे. ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील 107  गावांमध्ये 1298  जनावरांना लम्पी प्रादुर्भाव झाला. यापैकी 1208 जनावरे उपचाराअंती पूर्णपणे बरी झाली असून, 95 जनावरांचा मृत्यू झाला आहे.


घाबरून जाण्याचे कारण नाही...


इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ल्म्पीचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळाला नाही. त्यातच प्रशासनाने आणि सरकराने वेळीच लसीकरण सुरु केल्याने परिस्थिती आटोक्यात असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचं प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे. सोबतच शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 


प्रशांत बंब यांच्याकडून स्वखर्चाने लसीकरण...


एकीकडे जिल्ह्यातील लम्पीच्या लसीचा साठा संपला असतांना दुसरीकडे, मागील काही दिवसात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी स्वखर्चाने 80 हजार जनावरांचे लसीकरण केले आहे. त्यामुळे जर एका आमदाराला एवढ्या मोठ्याप्रमाणावर खाजगी लसी उपलब्ध होत असतील, तर प्रशासनाला लसी कशा मिळत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


महत्वाच्या बातम्या...


काय सांगता! एकट्या आमदाराने संपूर्ण तालुक्यातील 'लम्पी लसीकरण' केलं स्वखर्चाने


Radhakrishna Vikhe Patil : लम्पीमुळं राज्यात 2 हजार 100 जनावरांचा मृत्यू, डॉक्टरांनी हलगर्जीपणा करु नये, विखे पाटलांच्या सूचना