Sugarcane Crushing Season: गेल्यावर्षीच्या हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न चिंतेचा विषय बनला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर शेतातील उभा ऊस पेटवून देण्याची वेळ आली होती. मात्र यंदाही अतिरिक्त उसाच्या प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. कारण औरंगाबाद विभागात नव्याने सुरू होणाऱ्या गाळप हंगामासाठी गाळप होणाऱ्या उसाचे क्षेत्र हे सरासरी 20 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा अतिरिक्त उसाचा प्रश्न शेतकऱ्यांची आणि कारखानदारांच्या चिंतेत भर पाडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सन 2020-2021 च्या हंगामातील ऊस हा 2021-2022 च्या गाळप हंगामासाठी उपलब्ध झाला होता. तर यावेळी उसाची नोंद घेताना साखर कारखाने आणि कृषी विभाग यांच्या माहितीत मोठी तफावत आढळून आली होती. दरम्यान यावेळी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक शेतकऱ्यांनी ऊस शेतातच पेटवून दिला होता,तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. अशातच आता सन 2022-23 च्या गाळपासाठी औरंगाबाद विभागात 2  लाख 3 हजार 790  हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी 1 लाख 67  हजार हेक्टर ऊस उपलब्ध होता. यंदा त्यात सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे यावर्षी देखील अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. 

सन 2022-23 साठी उसाचे क्षेत्र...

जिल्हा  एकूण क्षेत्र 
औरंगाबाद  37.552
जालना  47,227
बीड  84,208
जळगाव  8,046
धुळे  4,381
नंदूरबार  22,376
एकूण  2,03,790

एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी; ऊस परिषदेतून राजू शेट्टींची मागणी 

आत्तापासूनच नियोजन करण्याची गरज....

15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाची सुरवात झाली आहे. तर अनेक कारखान्यात अजूनही  गाळपला सुरवात झालेली नाही. मात्र गेल्यावर्षीचा अनुभव पाहिला तर शेवटपर्यंत ऊसतोडीसाठी मजूर मिळत नव्हते. त्यामुळे यंदाच्या हंगामातही गेल्यावर्षीप्रमाणे ऊसतोडीसाठी मजूर न मिळणे, हार्वेस्टर उपलब्ध नसणे, उशिरा ऊसतोड झाल्याचा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणे, आदी अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्तापासूनच यासाठी नियोजन करण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.