Aurangabad Crime News: औरंगाबादच्या वाळूज भागात एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. पत्नीला सासरी पाठविण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या जावयाने मामा व वडिलांच्या मदतीने सासऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजिया अफरोज सय्यद (रा. वाळूज) या विवाहितेचा सासरच्या मंडळीसोबत कौटुंबिक वाद असल्याने ती वाळूजला माहेरी निघून गेली होती. त्यानंतर पती अफरोज सय्यद, सासरे अफसर सय्यद व अफरोज याचे मामा इलियास सय्यद (सर्व रा. वाळूज) हे बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास नाजियाचे वडील अहेमद मोहम्मद पठाण यांच्या घरी गेले होते. यावेळी सासरे अफसर सय्यद व मामा इलियास सय्यद या दोघांनी वडील अहेमद पठाण यांची भेट घेऊन नाजिया हिला नांदविण्यास पाठवा, असे सांगितले. मात्र, नाजिया हिची सासू शब्बू यांना आणल्याशिवाय मुलीला सासरी पाठविणार नाही, असा पवित्रा अहेमद पठाण यांनी घेतला होता. त्यामुळे वादाला सुरवात झाली. 


वडिलांनी मुलीला पाठवण्यास नकार दिल्याने जावई अफरोज सय्यद आणि त्याच्यासोबत आलेल्या तिघांनी मुलीच्या वडीलांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या वादात जावई अफरोज सय्यद याने कारमधून लाकडी दांडा आणून सासरे अहेमद पठाण यांच्या डाव्या कानावर मारल्याने ते जखमी झाले. यानंतर जावई अफरोज याने पुन्हा सासऱ्यास दांड्याने मारहाण केली व तिघेही कारमधून पसार झाले. या प्रकरणी अहेमद पठाण यांच्या फिर्यादीवरून जावई अफरोज सय्यद, व्याही अफसर सय्यद व इलियास सय्यद (सर्व रा. वाळूज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Crime News : साक्ष देण्याच्या वादातून एका तरुणावर झाडली गोळी, औरंगाबादच्या वाळूज भागातील घटना


अश्लील फोटो व्हायरल करण्याची विवाहितेला धमकी 


दुसऱ्या एका घटनेत विवाहितेकडे लग्नाचा तगादा लावून तिला अश्लील फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एकाने 25  हजार रुपये खंडणीची मागणी केल्याची घटन समोर आली आहे. याप्रकरणी दोघांविरुध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख फरहान शेख नूर, सय्यद फिरोज सय्यद अकबर (दोघेही रा. चांदमारी) अशी आरोपींची नावे आहेत. छावणीतील एका 28  वर्षीय विवाहितेकडे 'तू पतीला सोडून माझ्याशी लग्न कर, मी तुझ्या मुलांचा सांभाळ करेल' असा तगादा शेख फरहान याने लावला. मात्र, विवाहिता नकार देत असल्यामुळे त्याने अश्लील फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी पीडितेला दिली. याशिवाय महिलेच्या दिराच्या मोबाईलवर संपर्क साधून दोघांनी 25  हजार रुपये दिले नाही, तर फोटो व्हायरल करू असेही धमकावले होते.