Aurangabad News: नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आले आहे. त्यामुळे वरील धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठ्यात मोठी वाढ होतांना पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून जायकवाडी धरणात 54 हजार 757 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु असून, धरणात 43.25 टक्के पाणीसाठा असल्याची नोंद धरण प्रशासनाने घेतली आहे. तर याच पार्श्वभूमीवर गोदावरी काठावरील 35 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडीवरील प्रकल्पातून सद्या 80 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच आजही नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असल्याने पाण्याचा वेग आणखी वाढू शकतो. त्यामुळे गोदावरील नदीला यावर्षी पहिल्यांदाच पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर मंगळवारी सायंकाळी वैजापूर-श्रीरामपूर मार्गावरील 22 गावांचा संपर्क तुटलेला होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा गावा-गावात जाऊन नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देतांना पाहायला मिळत आहे. तर पूरपरिस्थिती पाहता वैजापूर तालुक्यातील वांजरगाव येथे बचाव पथकाची टीम दाखल झाली आहे.
सरला बेटवर जाण्यासा मनाई...
नाशिक जिल्हयातील विविध धरणाव्दारे सोडलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीस 80 क्युसेस विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान वैजापूर तालुक्यातील वांजरगाव येथील सरला बेटच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यात आज गुरु पोर्णिमा असल्याने सरला बेट येथे वैजापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र पूरपरिस्थिती पाहता नागरिकांची सुरक्षितता विचारात घेवून तसेच कुठल्याही प्रकारची जीवित-वित्त हानी होऊ नये म्हणून सरला बेटवर जाण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. तसेच या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास किंवा उल्लंघन करण्यासाठी इतरांना प्रेरित केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
Maharashtra Rains: पावसाचं धुमशान! आजही राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट, सतर्कतेचं आवाहन