Aurangabad News: शहरातील अनधिकृत होर्डिंग व खांबावरून लटकणाऱ्या वायरांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान औरंगाबाद खंडपीठाने औरंगाबाद महानगरपालिकेची चांगलीच खरडपट्टी केली. अवैध फलकांविरोधात कोर्टाने आदेश दिल्यावर मनपा प्रशासन थोडेदिवस कारवाई करते, मात्र त्यानंतर झोपेची गोळी घेऊन गप्प बसते अशा शब्दात न्यायालयाने औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनाला सुनावले आहे.
औरंगाबाद शहरात अनधिकृत केबल वायरचे जाळे निर्माण झाले असून, दुचाकीवर जाणाऱ्या एका दांपत्याच्या गळ्यात खांबावर लोंबकळणारी वायर अडकून महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रकरणी मुकेश भट यांनी अॅड. संदेश हांगे आणि अॅड. अमरसिंह सोनकवडे यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने शहरात लावण्यात आलेल्या मोठमोठ्या फलकांवरूनही नाराजी व्यक्त करत मनपा प्रशासनाला फटकारले आहे.
प्रसंगी थेट गुन्हे दाखल करा...
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नीट काम केले असते तर जनहित याचिका दाखल करण्याची वेळच आली नसती, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. अरुण पेडणेकर यांनी अनधिकृत केबल वायर काढून टाकण्याची कारवाई करण्यासह प्रसंगी थेट गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश दिले.
मनपाला खंडपीठाने दिला इशारा...
यावेळी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने शहरातील अवैध होर्डिंगबाबत सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. जिकडे पाहावे तिकडे भाऊ, दादांच्या सत्काराचे फलक पाहायला मिळतात. विशेष म्हणजे न्यायालयाने अनेकदा अवैध होर्डिंगबाबत कारवाईचे आदेश दिले. मात्र मनपा पंधरा दिवस पळापळ करत कारवाई करते, त्यानंतर मात्र झोपेची गोळी घेऊन गप्प बसते. त्यामुळे हा सर्व प्रकार न्यायालयाचा अवमान असून, याप्रकरणी मनपा प्रशासनावर कठोर कारवाईची वेळ येईल, असा इशारा खंडपीठाने यावेळी दिला.
शहरातील चौका-चौकात अवैध होर्डिंग
औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध होर्डिंगचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढले आहे. शहरातील चौका-चौकात राजकीय नेत्यांचे, भाऊ-दादांच्या वाढदिवसाचे अनधिकृत होर्डींग पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही खाजगी कोचिंग क्लासेसचे अनधिकृत होर्डिंग आणि पोस्टर सुद्धा शहरातील चौकात लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या...