Thackeray Group Protest: अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात सापडला असताना, महावितरणकडून थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केले जात आहे. त्यामुळे सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. वीजबिल सक्तीविरोधात ठाकरे गटाकडून 1 डिसेंबरला चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात आठ ठिकाणी शिवसेना चक्काजाम आंदोलन करणार आहे. 


शेतकरी संकटात असतांना त्यांची वीज कनेक्शन बंद केले जात आहे. रब्बीचा हंगाम सुरु असून पिकांना पाण्याची गरज असतांना महावितरण शेतातील वीज बंद करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानानंतर देखील वीज कंपनीकडून थेट रोहित्र बंद करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता या विरोधात ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे. 


औरंगाबाद जिल्ह्यातील 'या' ठिकाणी चक्काजाम...



  • इसारवाडी फाटा, गंगापूर 

  • शिऊर बंगला, वैजापूर

  • पिशोर नाका, कन्नड

  • सह्याद्री हॉटेल समोर, पैठण 

  • आंबेडकर चौक, सिल्लोड 

  • टी पॉइंट फुलंब्री

  • भक्तनिवास समोर, रत्नपुर

  • करमाड, औरंगाबाद 


शेतकरी अडचणीत...


यावर्षी सुरवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यातच परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचं सिझन पूर्णपणे गेले आहे. अशात आता रब्बीत त्याची भरपाई भरून काढण्यासाठी बळीराजा धडपड करत असतांना महावितरण कंपनीकडून सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत आहे. अनेक भागात वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी थेट रोहित्र बंद केले जात असल्याने गावची-गाव अंधारात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. 


वीजबिल भरूनही कनेक्शन खंडीत...


ज्या शेतकऱ्यांनी चालू वीजबिल भरले असतील, त्यांचे वीज कनेक्शन खंडीत करू नयेत असे आदेश ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मात्र असे असतांना देखील कंपनीकडून सरसकट वीज कनेक्शन बंद केली जात आहे. काही ठिकाणी थेट राहित्र बंद करण्यात येत आहे. वीज भरलेल्या शेतकऱ्यांचे देखील वीज कनेक्शन बंद केले जात असल्याचं म्हणत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी फडणवीस यांना पत्र लिहले आहे. 


फडणवीसांच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांचे कनेक्शन कट; भाजप आमदाराकडूनच पोलखोल