Aurangabad Farmers News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन देखील औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि पैठण या दोन तालुक्यांना नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आल्याने शेतकरी आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान याबाबत रविवारी पैठणमध्ये शेतकऱ्यांची बैठक पार पडली असून, 4 डिसेंबरपर्यंत अनुदान मिळाले नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तर आमची मागणी मान्य न झाल्यास कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळात 'जलसमाधी' घेणार असल्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे. 


पैठण आणि वैजापूर तालुका अतिवृष्टी अनुदानातून वगळल्यामुळे अन्नदाता शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची रविवारी नाथसागर धरणाच्या पायथ्याशी बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने वैजापूरसह पैठण तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान देण्यापासून वंचित ठेवल्याचे परिपत्रक काढल्यामुळे शेतकऱ्यांमधील नाराजीवर चर्चा झाली. तर याचवेळी रस्त्यावर उतरून लढाई लढण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आला. तर 4 डिसेंबरपर्यंत सरकारला वेळ देण्याचा या बैठकीत निर्णय झाला असून, त्यानंतर कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळात जलसमाधी घेणार असल्याचं अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी म्हंटले आहे. त्यामुळे यावरून आता राजकीय वातावरण देखील पेटण्याची शक्यता आहे. 


बैठकीला छावणीचे स्वरूप


शेतकऱ्यांच्या बैठकीच्या दृष्टीने या बैठकीला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी दंगा काबू पोलिस पथक, पैठण स्थानिक पोलीस, कृषी व महसूल विभागाचा कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असल्यामुळे धरणाच्या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. विशेष म्हणजे धरणाच्या काठावर ही बैठक आयोजित करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 


अनुदान मिळवून देणार: भुमरे


वैजापूर आणि पैठण तालुका नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले असतांना पैठणचे आमदार तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी मदत मिळवून देणार असल्याचं म्हटले आहे. पैठण मतदारसंघ नुकसानभरपाईतून वगळला असल्याच्या अफवा पसरवण्याचे काम काही लोकं करत असून, जिल्ह्यातील एकही तालुका वगळला जाणार नसल्याचा दावा भुमरे यांनी केला आहे. तर लवकरच पैठण आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील नुकसानभरपाईची मदत दिली जाणार असल्याचं देखील भुमरे म्हणाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापतांना पाहायला मिळत आहे. 


नुकसानभरपाई द्या अन्यथा जायकवाडीत जलसमाधी घेऊ, शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी पुन्हा 'ऍक्टीव्ह'