Aurangabad News: गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस आणि प्रशासनाकडून नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र असे असतांना देखील रविवारी मकरसंक्रातीच्या (Makar Sankranti 2023) दिवशी अनेकांनी नायलॉन मांजाचा (Nylon Manja) वापर केल्याचं समोर आले आहे. कारण मकरसंक्रातीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे आणि पतंग उडविण्याच्या नादात काहीजण जखमी होण्याच्या घटना औरंगाबाद शहरात (Aurangabad City) घडल्या. यापैकी दहा जखमी घाटीत उपचार घेऊन परतले. गंभीर इजा नसल्याने कुणालाही दाखल करण्यात आले नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 


नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाल्याच्या तीन घटना शहरात मागील पंधरा दिवसांत घडल्या आहेत. मांजामुळे गळा चिरला गेल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे. यातील एका तरुणाच्या गळ्याला दहा टाके लागल्याने त्याच्यावर अजून रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान रविवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे आणि पतंग उडविण्याच्या नादात अनेकजण जखमी झाले. एकट्या घाटी रुग्णालयात दहा जणांनी उपचार घेतले. नायलॉन मांजामुळे एका मुलाच्या बोटांना, एका व्यक्तीच्या हनुवटीला, तर एका तरुणाच्या पायाला जखम झाली. याबरोबर इतर काही रुग्णही घाटीत आले. परंतु कोणीही गंभीर जखमी नसल्याने, यापैकी कोणालाही उपचारासाठी दाखल करावे लागलेले नाही, असे घाटी प्रशासनाकडून देण्यात आली.


पोलिसांकडून पथकाची नियुक्ती! 


शहरात मकरसंक्रातीच्या निमित्ताने पतंग उडवीतांना नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने, याची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. औरंगाबाद शहर पोलिसांनी छापेमारी करत तब्बल 15 लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. तर शहर पोलिसांनी 17 पोलीस ठाण्यात विशेष पथकांची स्थपना केली आहे. तसेच औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी देखील जिल्ह्यातील सर्वच 23 पोलीस ठाण्यात विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. तसेच औरंगाबाद शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून यासाठी हेल्पलाईन नंबर देखील जाहीर करण्यात आले आहे. 


न्यायालयाचे कारवाई आदेश...


 मकरसंक्रातीच्या निमित्ताने पतंग उडवीतांना नायलॉन मांजाचा वापर करण्यात येतो. दरम्यान औरंगाबाद खंडपीठात दाखल असलेल्या सुमोटो जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने मांजा विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात प्रशासनाकडून नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक भागात मांजा विक्री सुरूच असल्याचे देखील चित्र पाहायला मिळाले. 


महत्वाच्या इतर बातम्या: 


Aurangabad : नायलॉन मांजावर संक्रात! औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 15 लाखांचा मांजा जप्त