Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज महानगर (Waluj Mahanagar) परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. मकरसंक्रांतीनिमित्त मंदिरात वाण चढवायल्या जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओरबाडून नेल्याची घटना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास बजाजनगर परिसरातील जागृत हनुमान मंदिराजवळ घडली. विशेष म्हणजे मंगळसुत्र हिसकावून पळ काढलेल्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या नागरिकांवर चोरट्यांनी गावठी पिस्तुल रोखत पसार झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, वाळूजच्या बजाजनगर परिसरातील विठ्ठलकृपा हाउसिंग सोसायटीतील पार्वती विजय पंतगे या परिसरातील इतर चार ते पाच मैत्रीणींसह रविवारी बारा वाजेच्या सुमारास मकरसंक्रांतीनिमित्त देवाला वाण चढवण्यासाठी जात होत्या. दरम्यान कृष्णमाई सोसायटीसमोर दुचाकीवरून आलेल्या दोघा भांमट्यांनी पंतगे यांच्या गळ्यातील सुमारे सहा तोळ्याचा राणी हार, दीड तोळ्याचे मिनी गंठण ओरबाडून मोरे चौकाच्या दिशेने धूम ठोकली. त्यामुळे पंतगे यांनी आरडाओरडा सुरु केला. 


दुचाकीवर आलेल्या दोघांनी पंतगे यांच्या अंगावरील दागिने ओरबडून नेल्याने त्यांनी चोर असल्याचं सांगत आरडाओरडा केला. याचवेळी तिथे उपस्थित असलेले जीवन चौधरी व त्यांच्या चार ते पाच मित्रांनी मंगळसुत्र चोरांचा पाठलाग सुरु केला. मात्र काही अंतरावर पुढे जाताच वैष्णव देवी मंदिराजवळ मंगळसूत्र चोरट्यांनी पाठलाग करणाऱ्यांवर गावठी पिस्तुल रोखला. पिस्तुल पाहून पाठलाग करणारे नागरीक घाबरले आणि त्यांनी पाठलाग करणे बंद केले. त्यामुळे दोन्ही चोरटे पसार झाले. 


नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 


याप्रकरामुळे वाळूज महानगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. खास करून महिलांमध्ये अशा घटनांमुळे घराबाहेर पडणेही अवघड झाले आहेत. भर दिवसा दुचाकीवर आलेले तरुण सहज महिलांच्या गळ्यातील दागिने घेऊन पसार होत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिक करत आहे. 


आठवड्यातील तिसरी घटना...


वाळूज परिसरात मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढत असून, गेल्या आठवड्याभरात आजची तिसरी घटना समोर आली आहे. गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रूपाली शिवाजी जाधव (रा. स्वामी समर्थनगर) या त्यांच्या मैत्रीणीसोबत घराकडे परत जत होत्या. त्यावेळी मोहटादेवी चौकाजवळ दुचाकीवरून आलेल्या भांमट्याने जाधव यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र हिसकावून फरार झाले. याप्रकरणी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास इंद्रप्रस्थ कॉलनीतील एक दाम्पत्य घराजवळ शतपावली करत होते. त्यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पळ काढला. मात्र सोबत असलेल्या पतीने त्या चोरट्याचा आंबेडकर चौकापर्यंत पाठलाग करून चोरट्याने हिसकावलेले पत्नीचे मंगळसुत्र परत मिळवले.


इतर महत्वाची बातम्या: 


औरंगाबादच्या बंद कंपनीत आढळला तरुणाचा मृतदेह, दगडावर ठेवून केलं हत्याराने मुंडके धडावेगळे