Aurangabad News: नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शिक्षक खोटे कागदपत्रे दाखवून घरभाडे उचलत असल्याचा आरोप करणारे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्याविरूद्ध शिक्षक संघटना आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात शिक्षकांनी आमदार बंब यांच्याविरुद्ध मोर्चा काढला आहे. शिक्षकांचा हा मोर्चा वैजापूर तहसील कार्यालयावर जाऊन धडकणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. 


आमदार बंब यांनी विधानसभेत बोलतांना अनेक शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा मांडला होता. तसेच हे शिक्षक शहरात राहून खोटे कागदपत्रे दाखवून घरभाडे उचलत असल्याचा आरोप सुद्धा बंब यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाच्या विरोधात वैजापूरात शिक्षक संघटनांनी मोर्चा काढला आहे. शहराच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाततून या मोर्चाला सुरवात झाली असून, मोर्चा तहसील कार्यालयावर जाऊन धडकणार आहे. या मोर्च्यात शेकडो शिक्षकांनी सहभाग नोंदवला असून, महिला शिक्षकांची उपस्थिती सुद्धा पाहायला मिळाली आहे.


काय म्हणाले मोर्चेकरी...


यावेळी बोलतांना मोर्चेकरी शिक्षक म्हणाले की, आमदार बंब यांनी शिक्षकांबद्दल विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. तसेच त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला आहे . तर प्रशांत बंब यांनी फक्त आत्ताच शिक्षकांच्या बद्दल विधान केले नाही तर,गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम ते करत आहेत. मुळात कर्मचारी मुख्यालयी राहणे हा मुद्दा नसून, बंब नेहमीच वेगवेगळ्या शाळांना भेटू देऊन दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. तर आधी विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहावी त्यानंतर त्यांच्यावर संशय घ्यावे अशी भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली.  


मोर्चेकरी शिक्षकांच्या निवेदनातील मागण्या...



  • शिक्षकांची नोकरी ही अत्यावश्यक सेवेतील बाब खरोखरीच आहे का? शालेय वेळेनंतर विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शिक्षकांनी गावात काय काम करणे अपेक्षित आहे?

  • शिक्षकांना मुख्यालय निवासाची सक्ती करायची झाल्यास वाडी-वस्ती, गावागावात त्यांना भाड्याने खोल्याही मिळू शकत नाही; अशा स्थितीत वीज, पाणी, शौचालयासह आपल्या माध्यमातून शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून द्यावीत, मुख्य म्हणजे मुख्यालयाची ही अनावश्यक अट काढून टाकावी तसेच घर भाडे भत्ता हा वेगळा न दाखवता पगाराचाच एक भाग करावा.

  • विद्यार्थी आणि शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांची आणि विषय शिक्षकांची हजारो रिक्त पदे तसेच पर्यवेक्षीय यंत्रणेतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी आदी पदांची भरती आणि पदोन्नती तात्काळ करण्यात यावी.

  • वारंवार विविध माहीत्यांची "तात्काळ" मागणी आणि शिक्षकांच्या मागील शेकडो अशैक्षणिक कामांची अनावश्यक जबाबदारी काढून घेतली जावी.

  • गावागावातील राजकारण आणि लोकांच्या शाळेतील अनावश्यक हस्तक्षेपापासून शाळांना मुक्त करून शिक्षकांना अध्यापनासाठी स्वातंत्र्य आणि सुरक्षा द्यावी.

  • चार-पाच दिवसांपासून वारंवार शिक्षकांच्या पगारावर मानहानीकारक चर्चा करून त्यांच्या ताटातील घास मोजायचे काम चालू आहे. शिक्षकी पेशा स्वीकारलेले जवळपास सर्वच जण गोरगरीब, शेतकरी, सामान्य कुटुंबातील आहे, कुणीही उद्योगपतींच्या घरातील नाही. शिवाय शिक्षकांना दिला जाणारा पगार हा प्रगत देशातील शिक्षकांपेक्षा नक्कीच कमी असून विविध शिक्षणतज्ञ आणि अभ्यासकांच्या शिफारशीनुसार कायदेशीर रित्या दिला जातो.

  • सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींनी शिक्षकी पेशा स्वीकारलेला असून देशाचे भविष्य सुदृढ करणाऱ्या व्यक्तींवर अशा प्रकारे हल्ला करून सर्वसामान्य गोरगरीब, शेतकरी, निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना हादरा देऊन त्यांना उध्वस्त करत उद्योगपतींच्या माध्यमातून शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या षडयंत्राचा हा डाव आपण उधळून लावावा.


महत्वाच्या बातम्या... 


Aurangabad: प्रशांत बंब यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप, शिक्षकाच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल


Aurangabad: तब्बल 151 अशैक्षणिक कामे करणाऱ्या शिक्षकांकडून गुणवत्तेची अपेक्षा; शिक्षकाचं बंब यांना खरमरीत पत्र


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI