Aurangabad : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन आमदाराच नव्हे तर मराठवाड्यातील 80 टक्के जिल्हाप्रमुख सुद्धा शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी केला आहे. त्यांच्या याच दाव्याला आता शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उत्तर दिले आहे. दोन आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्या भुमरे यांना हे माहित नाही की, त्यांच्या गटाचे 15 ते 16 आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचं खैरे म्हणाले आहे. तसेच हे आमदार शिंदे गटात अस्वस्थ असल्याच सुद्धा खैरे म्हणाले. 


एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना खैरे म्हणाले की, दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचं भुमरे एका गावठी सभेत ते बोलले, ज्यात फक्त 25 ते 30 लोकं होते. बाकी सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. पण त्यांना हे माहित नाही की, शिंदे गटातील 15 ते 16 आमदार मातोश्रीच्या संपर्कात आहे. फक्त मातोश्रीच्याच नाही तर नेत्यांच्या म्हणजेच आमच्याही संपर्कात आहे. ते आम्हाला भेटत सुद्धा आहे. आपण उद्धव ठाकरेंना उगाच सोडले असे आता त्या आमदारांना वाटत आहे. नाव कधी सांगत नसतात, भुमरे यांनी नाव सांगितले का? नाही सांगितले. त्यांनी मराठवाड्यातील आमदार संपर्कात असल्याचं सांगितले, आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील संपर्कात असल्याचं सांगतोय, असे खैरे म्हणाले 


सरकार पडण्याची भीती...


त्यामुळे  शिंदे गटातील महाराष्ट्रातील 15 ते 16 आमदार मातोश्रीच्या संपर्कात आहे. त्यांना कळून चुकलं आहे इथे काही मिळत नाही. सर्वांनाच 50 आमदारांना थोडी मंत्री करणार आहेत. तसेच 16 आमदारांच्याबाबतीत कधीही न्यायालयातून निकाल आल्यास सरकार पडेल त्यानंतर पुढे काय? असेही त्यांना वाटत आहे. त्यामुळे ते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा खैरे यांनी केला आहे.


शिंदे गटातील आमदार अस्वस्थ...


तसेच सत्तेत फक्त शिंदे गटाचे 50 आमदार आहे. युती असतांना शिवसेनेचे 63 आमदार असतांना भाजपने सेनेला उपमुख्यमंत्री पद दिलं नाही. त्यामुळे भाजपची चाल शिंदे गटातील आमदारांना कळाली आहे. फक्त 50 आमदारांच्या मुख्यमंत्री पदाला भाजप कधीही काहीही फोडाफोडी करून 150 करून टाकतील. त्यानंतर त्यांचे राज्य येईल आणि आम्हाला बाजूला करून टाकतील अशी भीती या आमदारांमध्ये आहे. त्यामुळे ते अस्वस्थ असल्याचं खैरे म्हणाले. 


राज-फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया 


मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. यावर बोलतांना खैरे म्हणाले की, राज ठाकरे आणि फडणवीस एकत्र आल्याची आम्हाला भीती वाटत नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे यांना आम्ही कडवटपणे पाठींबा देतोय. त्यामुळे आम्हाला बिलकुल कुणाचीही भीती वाटत नाही. त्यांच्या भेटीमुळे शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. मुंबई ही मराठी माणसाची मुंबई आहे, हिंदूची मुंबई आहे. त्यामुळे मुंबई फक्त शिवसेनाप्रमुखांच्या शब्दावर चालते. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नात्याबद्दल मी काहीही बोलत नाही. पण त्यांनी बाळासाहेब यांना सोडून नको जायला पाहिजे होते, असेही खैरे म्हणाले.