Aurangabad: देशभरात मोठ्या आनंदाने अमृत महोत्सव साजरा केला जात असताना, औरंगाबादमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'हर घर तिरंगा'  मोहिमेमध्ये प्रशासनाने मागवलेले राष्ट्रध्वज सदोष व निकृष्ट दर्जाचे आढळून आले आहेत. निकृष्ट दर्जाचे राष्ट्रध्वज असतांना सुद्धा कसे काय पाठवण्यात आले असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तर राष्ट्रध्वजाची तपासणी करूनच वाटप करावे असे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे. 


'हर घर तिरंगा उपक्रमात 13 ते 15 ऑगस्टपर्यंत तीन दिवस प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावावेत, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. त्यासाठी राष्ट्रध्वज पुरवण्यात येणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना राष्ट्रध्वज देण्यासाठी कन्नड पंचायत समितीमध्ये औरंगाबाद येथील अंकित ट्रेडर्सकडून मंगळवारी 44 हजार राष्ट्रध्वज मागवण्यात आले. 


मात्र पंचायत समितीला पुरवठा करण्यात आलेले राष्ट्रध्वज हे दर्जाहीन आणि गंभीर चुका असलेले आहेत. राष्ट्रध्वज लावणे आणि फडकवण्याबाबत सामान्य नागरिक अनभिज्ञ आहेत. निकृष्ट आणि सदोष राष्ट्रध्वज घरावर लावणे आणि फडकावणे चुकीचे ठरणार आहे. याबाबत कारवाई होऊ शकते, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांना राष्ट्रध्वज पुरवठा करतांना तपासून पुरवठा करण्याच्या सूचन वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.  


महापालिकेने दोन लाखांहून अधिक ध्वज परत पाठवले


कन्नड पंचायत समितीत घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान औरंगाबाद महानगरपालिकेला सुद्धा पुरवठा करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजात गंभीर चुका असल्याचे समोर आले आहेत. ठेकेदाराकडून महापालिकेला पाठवण्यात आलेले राष्ट्रध्वज निकृष्ट दर्ज्याचे असल्याचे समोर आल्यानंतर औरंगाबाद महापालिका प्रशासक अभिजित चौधरी यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. आलेल्या तिरंगा ध्वजांचा पंचनामा करत दोन लाखांहून अधिक ध्वज परत पाठवले आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी आपण निकृष्ट दर्ज्याचे राष्ट्रध्वज परत पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याच चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. 


नागरिकांनी काळी घ्यावी...


'हर घर तिरंगा उपक्रमात 13 ते 15 ऑगस्टपर्यंत तीन दिवस प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावावेत असे आवाहन सरकारने केले आहे. त्यामुळे नागरिकांसाठी अनेक शासकीय कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र राष्ट्रध्वज घेतांना ते योग्य आहे क? राष्ट्रध्वजात काही चुका तर नाही ना? तसेच राष्ट्रध्वजाचा दर्जा कसा आहे, याची खात्री नागरिकांनी करून घेण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहेत. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची प्रत्येकांनी काळजी घेण्याचं सुद्धा सरकारकडून सांगण्यात आले आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Photo: तब्बल 18 हजार विद्यार्थ्यांसह पालकांकडून सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम


EXCLUSIVE PHOTO: तब्बल 375 मीटर लांब तिरंगा ध्वज, औरंगाबादमध्ये निघाली महाकाय तिरंगा रॅली