Aurangabad News: मंगळवारी झालेला मंत्रीमंडळ विस्तार अनेक करणाने गाजला. कुणाला संधी मिळाली तर कुणाची संधी हुकली आहे. मात्र याचवेळी औरंगाबाद पश्चीमचे आमदार शिरसाट यांची हुकलेली संधी मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. सोबतच सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची ऐनवेळी झालेली एन्ट्री सुद्धा चर्चेत होती. तर सत्तारांची ऐनवेळी झालेल्या 'एन्ट्री'मुळेच शिरसाट यांची मंत्रीमंडळातील संधी हुकली असल्याची चर्चा आहे. रात्रीपर्यंत फायनल झालेले शिरसाट यांचे नाव शपथविधीच्या काही तासांपूर्वी वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. 


शिरसाट यांचे नाव फायनल, पण...


औरंगाबाद जिल्ह्यातून शिंदे गटाकडून तीन आणि भाजपकडून एक नाव चर्चेत होते. ज्यात शिंदे गटाकडून पैठणचे संदिपान भुमरे आणि औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचे नाव निशित समजले जात होते. अब्दुल सत्तार यांचे नेहमीचे टोकदार विधान आणि मुलांचे टीईटी घोटाळ्यात आलेल्या नावामुळे भाजपकडून त्यांना वगळण्याबाबत शिंदे यांच्याकडे बोलण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे भुमरे आणि शिरसाट नाव अंतिम समजले जात होते.


मात्र रात्री तीन वाजता सत्तार यांनी शिंदे यांची भेट घेतली. त्यांनतर सकाळी सुद्धा शिरसाट यांचे नाव अंतिम समजले जात होते. मात्र ऐनवेळी सत्तार यांचे नाव समोर आले आणि शिरसाट यांचे नाव वगळले गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सत्तारांची ऐनवेळी झालेल्या 'एन्ट्री'मुळेच शिरसाट मंत्रीमंडळातून 'ऑऊट' झाले असल्याची चर्चा औरंगाबादकरांमध्ये पाहायला मिळत आहे. 


अशी झाली सत्तारांची एन्ट्री...


अब्दुल सत्तार यांचे बेधडक विधान आणि मुलांचे टीईटी घोटाळ्यात आलेल्या नावामुळे सुरवातीपासून भाजपने त्यांच्या नावावर आक्षेप घेतला होता. तसेच सत्तार यांना टाळता आले तर पहा असे भाजपकडून शिंदे यांना सांगण्यात आल्याची सुद्धा चर्चा आहे. मात्र बंडाच्या सुरवातीपासून सत्तार सोबत होते. बंडखोर आमदारांना शिंदे गटाची भूमिका समजून सांगण्यात सत्तार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांना टाळणे शक्य नसल्याची भूमिका शिंदे यांची होती. त्यात सत्तार यांनी रात्री तीन वाजता शिंदे यांची भेट घेतली आणि आपली बाजू मांडली. त्यामुळे अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण एकाच वेळी औरंगाबादला तीन मंत्रिपद देणे शक्य नव्हते आणि तसेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांवर अन्याय झाल्यासारखं वाटले असते, म्हणून ऐनवेळी शिरसाट यांचे नाव वगळण्यात आले.