Smart Bus Aurangabad: कोरोना काळ आणि एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे बंद पडलेली 'माझी स्मार्ट बस' पुन्हा नवीन ऊर्जेने सुरू करण्यात आली आहे. तर आजपासून आणखी पाच नवीन मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसने दोन हजारात तीस दिवस कोणत्याही मार्गावर कितीही वेळेस मनसोक्त प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.


प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहर बससेवा अँड्रॉइडद्वारे संचलित ई-तिकिट सिस्टिम सोबत सुरू आहे. ह्या सिस्टीमद्वारे प्रवासी बस भाडे रोख रक्कमेच्या व्यतिरिक्त स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड आणि मोबाईल वॉलेटद्वारे ही देऊ शकणार आहे. तर नव्याने बस ड्रायव्हर आणि कंडक्टरची भरती करण्यात आली असून नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजनासहित आणखी पाच नवीन मार्गावर 'माझी स्मार्ट बस' सेवा सुरू होत आहे.


नवीन पाच मार्ग...


मार्ग क्र  07 - औरंगपुरा ते हिंदुस्तान आवास
मार्ग क्र. 08 - औरंगपुरा ते वाळूज
मार्ग क्र. 10 - औरंगपुरा ते शिवाजीनगर
मार्ग क्र. 16 - सिडको ते माळीवाडा
मार्ग क्र. 43 - मध्यवर्ती बस स्थानक ते करमाड


करा मनसोक्त प्रवास...


1) "प्रवास करा मनसोक्त" योजनेअंतर्गत 2000 मध्ये 30 दिवस कोणत्याही मार्गावर कितीही वेळेस मनसोक्त प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
2) दिवसाला केवळ 80 रूपये देऊन शहरात नागरिकांना कोठेही प्रवास करता येईल.
3) साप्ताहिक रिचार्ज अंतर्गत केवळ पाच दिवसांचे पैसे देऊन नागरिक सात दिवस प्रवास करू शकतील. 
4) मासिक योजनेअंतर्गत नागरिक केवळ वीस दिवसांचे पैसे देऊन 30 दिवस प्रवास करू शकतील. 
5) त्रैमासिक योजनेअंतर्गत साठ दिवसाच्या भाड्यात 90 दिवस प्रवास करता येणार आहे.


Devendra Fadnavis Ministry: फडणवीसांच्या मंत्रीमंडळात एकट्या औरंगाबादला चार मंत्रिपद?


एसटी आंदोलनाचा फटका...


औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने औरंगाबादकरांसाठी 'माझी स्मार्ट बस' सुरु करण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात कोरोना आला त्यांनतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे बसवर ड्रायव्हर आणि कंडक्टर मिळत नसल्याने नवीन बस धूळखात पडल्या होत्या. मात्र त्यांनतर आता नव्याने बस ड्रायव्हर आणि कंडक्टरची भरती करण्यात आली असून पुन्हा एकदा स्मार्ट बस औरंगाबादच्या रस्त्यावर धावणार आहे. त्यामुळे नोकरी करणारे आणि शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.