Aurangabad News: राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घटना घडत असताना, औरंगाबादच्या राजकारणात मात्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे. याचे धक्के जरी पक्षाला आज जाणवत नसले तरीही आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळात मंजुरी देण्यात आल्याने काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे. तर औरंगाबादमध्ये 200 मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोणताही विरोध करण्यात आला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलं आहे. त्यामुळे औरंगाबादच्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. तर काँग्रेसचे औरंगाबाद शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर शहरातील काही माजी नगरसेवक आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याच समोर आले आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहे.
Aurangabad Renamed : खडकी ते औरंगाबाद आणि आता संभाजीनगर, काय आहे या शहराच्या नावाचा इतिहास?
हिंगोलीतही पडसाद...
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचे पडसाद आता हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण हिंगोलीच्या अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील मुस्लिम काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सामूहिक राजीनामे पाठवले आहेत. नामांतराचा निर्णय घेत असताना काँग्रेसच्या मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने हे राजीनामे देत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. हिंगोली जिल्ह्यातील 50 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या त्या एका निर्णयाने काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला आहे.
एमआयएमचाही विरोध
काँग्रेसप्रमाणे एमआयएमकडून सुद्धा औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला जात आहे. या निर्णयानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी रात्री महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. सोबतच कायदेशीर लढाई लढण्यासाठी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन सुद्धा केले. औरंगाबादमध्ये येऊन विकासाच्या मुद्यावर बोलणारे उद्धव ठाकरे सत्ता जात असल्याच कळताच औरंगाबादच नाव बदलून गेले. तर नामांतराचा श्रेय आपल्याला मिळावा म्हणून उद्धव ठाकरे यांनी जाता-जाता हा निर्णय घेतला असून, त्यांना संभाजीराजेंबद्दल कोणतेही प्रेम नसल्याचं जलील म्हणाले. तसेच या निर्णयाला विरोध करण्यासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असे जलील म्हणाले.