Aurangabad Cow News : औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका गर्भवती गायीच्या (Cow) पोटात चक्क 50 किलो प्लास्टिक कॅरी बॅग (Plastic Carry Bag) आढळून आल्या आहेत. त्यामुळे शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी गायीच्या पोटातून या प्लॅस्टिक कॅरी बॅग बाहेर काढल्या आहेत. तर संबंधित गाय आता ठणठणीत असल्याची माहिती गायीचे मालक बद्रीनाथ लिपाने यांनी दिली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील कारकीन गावातील बद्रीनाथ लिपाने यांच्याकडे एक सुंदर अशी गाय आहे. लिपाने कुटुंबातील सदस्य या गायीला आपल्या लेकराप्रमाणे जीव लावतात. दरम्यान ती गर्भवती झाली आणि आता तिला सातवा महिना सुरु आहे. पण याच काळात गाय जागेवरच बसून होती आणि उठत नव्हती. काही दिवसांपूर्वी तिला पोटफुगीचा त्रास असल्यानेच तिला त्रास जाणवत असल्याचा संशय आल्याने लिपाने यांनी जनावरांच्या डॉक्टरांना उपचारासाठी बोलावले. 


पोटात तब्बल 50 किलो 'प्लास्टिक'
गायीची तब्येत खराब झाल्याने लिपाने यांनी ढोरकीन येथील शासकीय पशुवैद्यकीय सर्जन डॉ भारत डिघोळे यांना माहिती देऊन उपचारासाठी बोलावले. डॉ. डिघोळे यांनी गायीची तपासणी केली असता तिच्या पोटात काही तरी असल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. लिपाने यांनी देखील होकार दिल्याने, गायीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियानंतर गाईच्या पोटात तब्बल 50 किलो प्लास्टिक कॅरी बॅग आणि खराब चारवट आढळून आले. त्यामुळे हे पाहून लिपाने यांना धक्काच बसला. 


गायीची तब्येत ठणठणीत...
लिपाने यांच्या गर्भवती गायीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या पोटात 50 किलो प्लास्टिक कॅरी बॅग आढळून आल्या. मात्र या शस्त्रक्रियेनंतर गाय आता ठणठणीत आहे. तसेच अन्न पाणी देखील सेवन करु लागली आहे. त्यामुळे वेळेत उपचार केल्याने लिपाने यांच्या गायीला एकप्रकारे जीवनदान मिळालं. तर लिपाने कुटुंबातील सदस्यांनी डॉ.डिघाळे यांचे आभार मानले.


जनावरांची काळजी घ्यावी...
अनेकदा जनावरांचे मालक आपल्या जनावरांना चरण्यासाठी गावात किंवा इतर ठिकाणी मोकळ सोडतात. यावेळी अनेकदा जनावर प्लास्टिक, दोरी, निर्जन्य होणाऱ्या गोष्टी वस्तू देखील खाऊन टाकतात. त्यामुळे त्या वस्तू त्यांच्या पोटात तशाच कायम असतात. जेव्हा याचे प्रमाण वाढते तेव्हा जनावरांना याचा त्रास जाणवत असतो. तसेच वेळीच या वस्तू पोटातून बाहेर न काढल्यास जनावरांचा जीव ही जाऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टींपासून जनावरांना दूर ठेवण्याचं आवाहन डॉक्टर डिघोळे यांनी केले आहे.