Aurangabad Abortion News: पोलीस आणि आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईनंतर औरंगाबादच्या (Aurangabad) चित्तेगाव येथे एका स्त्री रुग्णालयात डॉ. अमोल जाधव आणि डॉ. सोनाली जाधव यांचे अवैध गर्भपात केंद्र सुरु असल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर एका महिलेचा गर्भपात केल्याने तिची प्रकृती बिघडली असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. मात्र या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान औरंगाबाद गर्भपात प्रकरणात (Aurangabad Abortion Case) पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होत असून, यात मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच गर्भपात करण्यात आलेल्या महिलेच्या बाबतीत देखील अशीच काही माहिती समोर आली आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध गर्भपात करण्यातून प्रकृती गंभीर झालेल्या 27 वर्षीय महिलेवर घाटीत उपचार सुरु आहेत. ही महिला बुलढाणा जिल्ह्यातील असून, गर्भपात करण्यासाठी औरंगाबादमध्ये आली होती. या महिलेला यापूर्वी दोन मुली आहेत. मात्र यावेळी पुन्हा मुलीचाच गर्भ असल्याचे कळल्यानंतच गर्भपात करण्यात आल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेचा यापूर्वीही गर्भपात झालेला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. तसेच नातेवाईकांचा देखील जबाब घेण्यात येणार असल्याचे कळत आहे. 


मोठं रॅकेट असण्याची शक्यता...


गर्भपात करण्यात आलेली महिला बुलढाणा जिल्ह्यातून औरंगाबादमध्ये आली होती. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा व्याप किती मोठा आहे याचा अंदाज येतो. तसेच यावेळी पुन्हा मुलीचाच गर्भ असल्याच कळल्यावर गर्भपात करण्यात आल्याने, महिलेची सोनोग्राफी कुठे करण्यात आली असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे या डॉक्टर दांपत्याने आतापर्यंत किती गर्भपात केले? सोनोग्राफी करून मुलीचा गर्भ असल्याची माहिती देणारे रुग्णालय कोणते याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र या सर्व प्रकरणात मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


गर्भपात झालेल्या 'त्या' महिलेस वॉर्डात हलवले


डॉ. अमोल जाधवने बुलढाणा येथील महिलेचा गर्भपात केल्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाल्याने सुरवातीला तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तेथून महिलेला शनिवारी घाटीत दाखल करण्यात आले. तर शासकीय डॉक्टरांकडून तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. रविवारी प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याने या महिलेस आयसीयूतून वॉर्डात हलवण्यात आले. दरम्यान, गर्भपातानंतर गंभीर झालेली ही महिला व तिचे नातेवाईक आता वेगवेगळी उत्तरे देत आहेत. 


संबंधित बातम्या: 


मोठी बातमी: परळीतील मुंडे गर्भपात प्रकरणाची औरंगाबादमध्ये पुनरावृत्ती; डॉक्टर पती-पत्नी फरार