Aurangabad News: शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील (Shahajibapu Patil) म्हणजे करमणुकीचं पात्र असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी केली आहे. त्यांच्या याच टीकेला आमदार शहाजी पाटलांनी खोचक शब्दात उत्तर दिलं आहे. तर माझ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना लवकरच जाहीर सभेतून उत्तर देणार असून, माझी पुढची तोफ आता 12 सप्टेंबरला पैठणच्या मैदानावर धडाडणार असल्याचं शहाजी पाटील म्हणाले आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी  याबाबत माहिती दिली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून शहाजी पाटलांवर आरोपांचे बाण सोडले जात आहे. तर ‘काय दारू, काय चकणा, काय ते 50 खोके सगळं ओके’ अशी पोस्टरबाजी करीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सुध्दा  सोलापुरात आंदोलन केलं आहे. त्यामुळे आता या सर्वांना जाहीर सभेतून ओकेमध्ये उत्तर देणार असल्याचं शहाजी पाटील म्हणाले आहे. पैठणला 12 सप्टेंबरला जाहीर सभेतून हे उत्तर देणार असल्याचं पाटील म्हणाले आहे. त्यामुळे पैठणला होणाऱ्या या सभेत शहाजी बापू पाटील काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.


12 सप्टेंबरला पैठणमध्ये शिंदे गटाची जाहीर सभा...


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहे. या दरम्यान रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipanrao Bhumre) यांच्या पैठण मतदारसंघातील कावसनकर स्टेडियमवर मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत मराठवाड्यातील शिंदे गटाचे प्रमुख नेते,आमदार आणि मंत्री यांची सुध्दा उपस्थिती पाहायला मिळणार आहे. तर या सभेसाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे याच सभेला शहाजी बापू पाटील यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे.


Aurangabad : मुख्यमंत्र्यांचा 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौरा, भुमरेंच्या मतदारसंघात जाहीर सभा


शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी...


ज्या पैठण तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे, त्याच पैठण तालुक्यात काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) सुद्धा सभा घेतली होती. आदित्य ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने या गर्दीची चर्चाही झाली होती. त्यानंतर आता शिंदे गटाची पहिल्यांदाच पैठण तालुक्यात जाहीर सभा होत आहे. त्यामुळे या सभेत शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे त्या दृष्टीने सभेची जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे.


मुख्यमंत्री दुसऱ्यांदा औरंगाबाद दौऱ्यावर...


मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा औरंगाबाद दौऱ्यावर येत आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात त्यांनी औरंगाबादचा दोन दिवसीय दौरा केला होता. ज्यात त्यांनी शहरातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. सोबतच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात जाहीर सभाही घेतली होती. त्यानंतर आता 12 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा औरंगाबाद दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.